११० प्रणितींना पैठणी आणि आकर्षक ड्रेस मटेरियल
काँग्रेस नगरसेविका फिरदोस पटेल यांच्या अनोख्या उपक्रमाची चर्चा
सोलापूर : सोलापूर शहर मध्यच्या काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त यशदा युवती फाउंडेशनच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका फिरदोस पटेल यांनी राबविलेल्या अनोख्या उपक्रमात माळशिरस तालुक्यातील दहावीत शिकणारी “प्रणिती सुशीलकुमार शिंदे”ही विद्यार्थिनी “सोन्याची नथ” ची मानकरी ठरली. तर “प्रणिती” नाव असणाऱ्या ११० महिला,युवती मुलींनी पैठणी आणि आकर्षक ड्रेस मटेरियलची लयलूट केली . माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका फिरदोस पटेल यांनी राबविलेल्या मोफत पेट्रोल उपक्रमाचा तर तब्बल ७८७ सुशीलकुमारांनी लाभ घेतला होता . तर आता माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या कन्या व शहर मध्य विधानसभा मतदारसंघातून हॅटट्रिक करून विरोधकांना पराभवाची धूळ चारून जिंकलेल्या आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त नगरसेविका फिरदोस पटेल यांनी आयोजित केलेल्या नवीन उपक्रमात “सोन्याची नथ “आणि पैठणी व आकर्षक ड्रेस मटेरियलची महिला,युवती व मुलींनी लयलूट करत आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोठा केक कापून आनंदोत्सव साजरा केला.
ऑफिसर्स क्लब जवळील प्रणिती उद्यानात गुरुवारी सायंकाळी झालेल्या कार्यक्रमात माजी आमदार प्रकाश यलगुलवार,काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे,महिला शहराध्यक्षा हेमा चिंचोळकर आणि माजी शहराध्यक्षा सुमन जाधव यांच्या हस्ते पैठणी तसेच ड्रेस मटेरियलचे वाटप करण्यात आले.तर “सोन्याची नथ” ची मानकरी ठरलेल्या माळशिरस येथील “प्रणिती सुशीलकुमार शिंदे” हिला नगरसेविका फिरदोस पटेल यांनी स्वतःच्या हाताने तिच्या नाकात सोन्याची नथ घालून,पैठणी व पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला.
सोलापूर शहर मध्यच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सलग तीन निवडणुकांमध्ये दिग्गज उमेदवारांना पराभूत करून विकास कामांच्या जोरावर विजयी पताका फडकवली. गोरगरीब व सामान्य माणसांना केंद्रबिंदू मानून आमदार प्रणिती शिंदे यांनी केलेल्या विकास कामांमुळे या मतदारसंघातील तळागाळातील व उच्चशिक्षित मतदारांनी सलग १५ वर्षे आमदार प्रणिती शिंदे यांना निवडून दिले . त्यांच्या पावलावर पाऊल ठेऊन नगरसेविका फिरदोस पटेल यासुद्धा गेली १० वर्षे प्रभागातील जनतेची सेवा करत आहेत.त्यांच्या विकास कामाचा अवाका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे.याच कामाच्या जोरावर नगरसेविका फिरदोस यासुद्धा हॅटट्रिक करून तिसऱ्यांदा महापालिकेत काँग्रेस पक्षाच्या नगरसेविका म्हणून जातील असा विश्वास काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांनी व्यक्त केला.
आमदार प्रणिती शिंदे यांच्या कामावर निष्ठा ठेऊन नगरसेविका फिरदोस यांनी अनेक उपक्रमाच्या माध्यमातून जनतेच्या मनात आपले नाव कोरले असल्याचे गौरवोद्गार माजी आमदार प्रकाश यलगुलवार यांनी काढले.तर महिला शहराध्यक्षा हेमा चिंचोळकर आणि माजी शहराध्यक्षा सुमन जाधव यांनीसुद्धा नगरसेविका फिरदोस पटेल यांचे आमदार प्रणितीताई शिंदे यांच्याप्रति असलेल्या निष्ठेचे तोंडभरून कौतुक केले.
आमदार प्रणिती शिंदे यांनी विकासकामांच्या जोरावर हॅटट्रिक साधली आहे.जनतेनेसुद्धा विकासकामामुळे महिला म्हणून तीनवेळा आमदार प्रणितीताई शिंदे यांचा सन्मान केला आहे.त्याची उतराई करण्याच्या उद्देशाने सोलापूर शहर मध्य,शहर उत्तर व दक्षिण सोलापुर यासह ग्रामीण भागातील प्रणिती नाव असणाऱ्या महिला,युवती व मुलींनी नोंदवलेला सहभाग वाखाणन्याजोगा आहे.प्रणितीताई यांच्यासाठी सर्वतोपरी करण्याची आपली तयारी असल्याचे नगरसेविका फिरदोस पटेल यांनी यावेळी मनोगत व्यक्त करताना सांगितले.
आमदार प्रणिती शिंदे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आपला झालेला सन्मान आपण कधीच विसरणार नाही.त्यांच्या नावाने नगरसेविका फिरदोस पटेल यांनी दिलेली सोन्याची नथ कायम आठवणीत राहील अशी प्रतिक्रिया माळशिरस येथील “प्रणिती सुशीलकुमार शिंदे” नाव असणाऱ्या विद्यार्थिनीने दिली.
यावेळी नगरसेविका परवीन इनामदार,सोहेल शेख,शौकत पठाण,सोहेल पठाण,आशा सदाफुले,मनीषा उडानशिव,मुमताज गौर,स्वाती आवारे,रजिया जमादार,नाझेरा पठाण उपस्थित होते. ऐश्वर्या हिबारे हिने सूत्रसंचालन केले.