येस न्युज मराठी नेटवर्क । कोरोना काळात पाठवण्यात आलेल्या वाढीव वीजबिलांच्या मुद्द्यावरून सभागृहात आज गोंधळ उडाला. विधिमंडळ अधिवेशनाच्या कामकाजाला सुरूवात झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रश्नोत्तराचा तास तहकूब करून वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर चर्चा घेण्यात यावी, अशी मागणी केली. त्यावरून भाजपा आक्रमक झाली. सभागृहात गोंधळ सुरू झाल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मध्यस्थी करत वीज तोडणी मोहिमेला स्थगिती देत असल्याची घोषणा केली. या घोषणेनंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारचे आभार मानले.
सभागृहाचं कामकाज सुरू होण्यापूर्वी भाजपा आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन केलं. वाढीव बिलासंदर्भातील फलक झळकावत भाजपानं या मुद्द्याकडे सरकारचं लक्ष वेधून घेतलं. त्यानंतर सभागृहाचं कामकाज सुरू झाल्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी वाढीव वीज बिलाचा मुद्दा उपस्थित केला.