पुणे – उप पोस्ट ऑफिसमध्ये आलेल्या गुंतवणुकदारांनी केलेली गुंतवणुक ही मुख्य पोस्ट ऑफिसमध्ये केलेली आहे, असे सांगून त्यावर परस्पर कमिशन घेऊन पोस्ट खात्याची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. तब्बल 23 लाख 76 हजार 215 रुपयांची पोस्ट खात्याची फसवणूक केली असल्याची माहिती आहे.
याप्रकरणी विश्रांतवाडी आणि विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. योगेश नानारसाहेब वीर यांनी तक्रार दाखल केली आहे. त्यानुसार दिघी उपपोस्ट ऑफिसचे पोस्ट मास्तर ज्योतीराम फुलचंद माळी , क्लार्क भगवान श्रीरंग नाईक, धानोरी पोस्ट मास्तर गणेश तानाजी लांडे, धानोरी पोस्ट मास्तर मधुकर गंगाधर सूर्यवंशी, रमेश गुलाब भोसले , विलास एस देठे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोस्ट ऑफिसमध्ये गुंतवणुकदारांनी गुंतवणूक केली तर त्यामध्ये 2 टक्के कमिशन पोस्ट मास्तरांना मिळते. या नियमाचा गैरफायदा घेऊन दिघी पोस्ट कार्यालयात 16 जुलै 2018 ते 21 ऑगस्ट 2020 दरम्यान दिघी उपपोस्ट ऑफिसमध्ये 274 गुंतवणुकदारांनी 9 कोटी 62लाख 98 हजार रुपयांची गुंतवणूक पोस्टाच्या वेगवेगळ्या योजनांमध्ये केली होती. त्यांना धानोरी शाखा पोस्ट ऑफिस येथे खाते उघडण्यास लावल्याचे दाखविले. त्या रक्कमेपोटी 18 लाख 35 हजार 115 रुपये धानोरी पोस्ट ऑफिसास दिले. ती रक्कम आपसात वाटून घेतली. पोस्ट खात्याची खातेदारांचा विश्वास संपादन करुन त्यांचे बनावट सह्या करुन पोस्टाची फसवणूक केली. त्याप्रमाणे डंकर्क लाईनमध्ये आलेल्या 59 गुंतवणुकदारांची एकूण 2 कोटी 47लाख 60हजार रुपये रक्कम स्वीकारुन त्यांचे बीआरडी पोस्ट ऑफिसामध्ये टीडी खाते उघडण्यास लावून त्यांच्या कमिशनपोटी 4 लाख 95 हजार 200 रुपये स्वीकारले. त्यातील 75 टक्के रक्कम ज्योतीराम माळी याने घेऊन 25 टक्के रक्कम बीआरडी शाखा डाकपाल रमेश भोसले यांना दिली.
19 खातेदारांची फसवणूक
आरोपींनी विमाननगर येथील उप पोस्ट ऑफिसात उप डाकपाल म्हणून कार्यरत असताना उप पोस्ट ऑफिसात त्यांनी आवर्ती ठेवबात आणि सुकन्या समृध्दी योजना अंतर्गत खातेदारांनी त्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यासाठी काऊंटरवर आल्यानंतर त्यांची रक्कम स्विकारुन खातेधारकांकडे असलेल्या पासबुकवर रक्कम स्विकारण्याबाबत तारखेचे शिक्के मारुन शासकीय फिनाकल प्रणालीमध्ये त्यांची नोंद घेण्याची जबाबदारी विश्वासाने दिली असताना आरोपीने 19 खातेदारांनी आवर्ती ठेवखाते TD आणि सुकन्या समृध्दी योजना या योजने अंतर्गत खात्यांमध्ये विविध तारखांना जमा केलेली एकूण 45 हजारांची रक्कम सरकारी हिशोबामध्ये जमा न करता आर्थिक गैरव्यवहार करुन डाकखात्याची आणि 19 खातेदारांची फसवणूक केली.