रांची : देशातील भाजप विरोधी सरकारं पडण्याची मालिका सुरूच असून आता त्यामध्ये झारखंडचाही समावेश होण्याची शक्यता आहे. खाण घोटाळ्यामध्ये आरोप झाल्यानंतर मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांची खुर्ची धोक्यात आल्यानंतर ते आता राजीनामा देणार असल्याची माहिती आहे. मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे आज राज्यपालांच्या भेटीला गेले आहेत.
आज संध्याकाळी चार वाजता मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी कॅबिनेटची बैठक बोलावली होती. या बैठकीनंतर ते आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. या राजीनाम्यानंतर ते पुन्हा एकदा सत्तास्थापनेचा दावा करण्याची शक्यता असल्याचंही सूत्रांनी सांगितलं आहे.
खाण घोटाळ्यात नाव आल्यानंतर हेमंत सोरेन यांची आमदारकी रद्द करावी अशी शिफारस निवडणूक आयोगाने राज्यपालांकडे केली होती. या प्रकरणात त्यांची चौकशी सुरू असल्याने त्यांची आमदारकी रद्द करावी असं निवडणूक आयोगाने म्हटलं होतं. आता त्यावर झारखंडचे राज्यपाल निर्णय घेणार आहेत. त्या आधीच मुख्यमंत्री हेमंत सोरेन आपल्या आमदारकीचा राजीनामा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.