सोलापूर- राज्यातील कायदा व सुव्यवस्था नीट राहण्यासाठी गावोगावी पोलीस पाटील हे प्रशासनास मदत करतात. गावस्तरावरील शेवटचा घटक असणाऱ्या पोलीस पाटील यांचे मागील तीन महिन्यापासून मानधन रखडल्याने पोलीस पाटलांची दिवाळी देखील मानधनाविना साजरी करावी लागणार आहे.
राज्यशासनाने आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांना मानधनवाढीसोबत दिवाळी करिता बोनस जाहीर केला असून. त्यांच्याबरोबरच मानधन तत्वावर काम करणारे पोलीस पाटील यांना कोणत्याही प्रकारची मानधनवाढ मिळाली नाही. सर्वांना दिवाळीला बोनस मिळत असतो पोलीस पाटलांना बोनस तर सोडा मागे काम केलेल्या तीन महिन्याचे मानधनसुद्धा दिवाळीला वेळेत मिळेल की नाही याची शाश्वती नाही.
नेहमीच पोलिसांच्या दिमतीला राहणारा हा पोलीस पाटील गावातील संभाव्य घडामोडींची गोपनीय माहिती काळविण्याचीही जबाबदारीही पार पाडतो. पोलीस पाटील तुटपुंज्या मानधनावर काम करतात. त्यातही गेल्या तीन महिन्यांपासून पोलीस पाटलांना मानधनापासून वंचित राहावे लागल्याने त्यांची आर्थिक कुचंबणा होत आहे. त्यामुळे निधीची तरतूद करून लवकरच मानधन सुरू करण्यात यावे, अशी मागणी पोलीस पाटलांकडून करण्यात येत आहे.
गेले तीन महिने पोलीस पाटलांना मानधन मिळाले नसल्यामुळे मानधनावर निर्भर असणाऱ्याची आर्थिक कुचंबणा होत आहे.ऐन दिवाळीत मानधन नसल्याने पोलीस पाटलांच्या कुटुंबीयांनी दिवाळी सण साजरा करणे अवघड आहे. शासनाने लवकर पोलीस पाटलांचा मानधनाचा प्रश्न मार्गी लावून मानधन सुरळीत सुरू करावे.
- संतोष आसबे अध्यक्ष उत्तर सोलापूर पोलीस पाटील संघटना