मुंबई : आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजू लागले आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. राज्यातील सर्वच पक्ष सध्या जोमाने कामाला लागले आहेत. दरम्यान, काही पक्षांनी विधानसभेसाठी उमेदवारांची घोषणा केली आहे. तर काही पक्ष उमेदवारांची चाचपणी करत आहेत. अशातच मुंबईचे माजी पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी देखील निवडणूक लढवण्याची घोषणा केली आहे. विशेष म्हणजे त्यांनी प्रचाराला सुरुवातही केली आहे.
विधानसभा निवडणुकीच्या अधिकृत घोषणेपूर्वीच फोन टॅपिंग प्रकरणात वादग्रस्त ठरलेले मुंबईचे माजी आयुक्त संजय पांडे यांनी निवडणूक लढवण्याबाबत घोषणा केली आहे. संजय पांडे विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. संजय पांडे वर्सोवातून विधानसभा निवडणूक लढवणार असल्याचे सांगण्यात येत आहे. संजय पांडे हे कोणत्या पक्षातून निवडणूक लढवणार, याबाबत अद्याप काही सांगितलं नाही. दरम्यान, संजय पांडे यांनी स्वतः आपल्या उमेदवारीबाबत घोषणा केली. मात्र, कोणताही पक्ष सोबत नाही, असं देखील संजय पांडे यांनी स्पष्ट केलं आहे.