येस न्युज नेटवर्क : केरळमधील मलप्पुरममधील तनूर भागात रविवारी संध्याकाळी सुमारे 40 प्रवाशांना घेऊन जाणारी हाऊसबोट पलटी होऊन 21 जणांचा मृत्यू झाला. दुर्घटनेतील मृतांची संख्या आता 21 वर पोहोचली असून सात जणांची प्रकृती गंभीर आहे. सुरुवातीला बोट उलटली त्यावेळी नऊ जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर आणखी 15 जणांचा मृत्यू झाला. रात्री उशिरा मृतांचा आकडा आणखी वाढला. शोधकार्य अजूनही सुरु आहे. बोटीखाली आणखी लोक अडकल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. बुडालेली बोट किनाऱ्यावर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अपघातानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरु केले. या बचाव कार्यात अनेक स्वयंसेवक-कार्यकर्तेही मदत करत आहेत. लोकांचा शोध घेणं, जिवंत असलेल्यांना वाचवणं आणि जखमींना रुग्णालयात नेणं ही प्रक्रिया रात्रभर सुरु होती.