येस न्युज मराठी नेटवर्क : श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर पंढरपूर येथे मुख्य मंदिरात भजन , कीर्तन करण्यास बंदी घालण्यात आली आहे. चालू असलेला नामजप बंद करण्यात आला हा वारकरी संप्रदायाचा खूप मोठा अपमान आहे. त्या साठी अखिल भाविक वारकरी मंडळ यांचे कडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला. मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापक दोघांना ताबडतोब निलंबित करण्यात यावे. मुख दर्शनाला येणाऱ्या भाविकांसाठी स्वतंत्र रांग असते. सभा मंडपात जागा भरपूर असलेने भविकाना कसलाच त्रास होत नाही. दररोज मुख दर्शनाला येणाऱ्या भाविकांची संख्या जाहीर करावी. गर्दीचा सी सी टी व्ही व्हिडिओ प्रसिद्ध करावा. मंदिरातील कार्यालय संत तुकाराम महाराज भवन येथे सुरु करून कार्यालयाची जागा भविकासाठी उपलब्ध करून देण्यात यावी. मंदिरातील कर्मचाऱ्यांना भजन, कीर्तन याचा त्रास होत असेल तर त्यांनी राजीनामा द्यावा. शासनाने त्यांना निलंबित करावे. हा विषय खूप गंभीर असून याची ताबडतोब दखल घेऊन कारवाई करावी अन्यथा संपूर्ण महाराष्ट्र भर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असे निवेदन ईमेल द्वारे मा. मुख्यमंत्री यांना देण्यात आले आहे , असे अखिल भाविक वारकरी मंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष सुधाकर महाराज इंगळे यांनी एका पत्रकाद्वारे कळविले.