सोलापूर शहरातील भैय्या चौक येथे रेल्वे ब्रिज उभारण्याचे काम भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून सुरू आहे. यासाठी 14 डिसेंबर 2025 रोजी 103 वर्षे जुना ब्रिज पाडण्यात आला. याला जवळपास अडीच महिन्यांचा कालावधी लोटला तरीही रेल्वे आणि एन एच ए आय यांच्यामध्ये टपाल युद्ध सुरूच आहे. दोन मार्च रोजी एन एच ए आय कडून रेल्वे ब्रिजचे स्ट्रक्चर आणि सब स्ट्रक्चर चा आराखडा आणि डिझाईन रेल्वे बोर्ड ला पाठवले होते. मात्र रेल्वे बोर्डाच्या प्रिन्सिपल चीफ इंजिनियर कार्यालयाकडून ही फाईल मंजूर न करता परत पाठवली आहे. तसे पत्र सोलापूर रेल्वे डिव्हिजनल कार्यालयाने एन एच ए आईला पाठवले आहे.. रेल्वे ओव्हर ब्रिज मंजूर करताना रेल्वे बोर्डाने दिलेल्या मार्गदर्शक तत्त्वासह ही फाईल पुन्हा मुख्यालयाला ऑटोकॅड मध्ये पाठवावी असे पत्रात नमूद केले आहे. त्यामुळे दोन दिवसापूर्वी मार्किंग करून रेल्वे ब्रिजच्या पिलर उभारणीचे सुरू झालेले काम पुन्हा रखडले आहे. खासदार प्रणिती शिंदे तसेच पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी रेल्वे विभागाकडे याबाबत पाठपुरावा केला मात्र अद्याप यश आले नाही. एकूणच सोलापूरकरांच्या सहनशीलतेचा अंत पाहण्याचे काम रेल्वे विभागाकडून सुरू आहे. हा रेल्वे ब्रिज पाडल्यामुळे पर्यायी रस्त्यावरून ये जा करताना सोलापूरकर किती हैराण होतात हे रेल्वे,एनएचआय,महापालिका तसेच पोलीस अधिकाऱ्यांनी पाहणी गरजेचे आहे.

