सोलापूर विद्यापीठ: खुला गट व महाविद्यालयीन गटात होणार स्पर्धा
विजेत्या विद्यार्थ्यांना मिळणार रोख बक्षिसे!
सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर अध्यासन केंद्र आणि ललितकला व कला संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनकार्यावर आधारित भव्य प्रासंगिक चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आल्याची माहिती अध्यासन केंद्राचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी दिली.
कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर आणि प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा यांच्या मार्गदर्शनाखाली या चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मुक्त हस्त चित्रकार आणि विद्यापीठ व महाविद्यालयीन विद्यार्थी अशा दोन गटात ही स्पर्धा होणार आहे. ही स्पर्धा अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवन चरित्रावर आधारित प्रासंगिक असेल. या स्पर्धेत सध्या उपलब्ध असलेल्या चित्रा व्यतिरिक्त जीवन चरित्रावर रचनात्मक चित्र काढणे अपेक्षित आहे. कमीत कमी आकार 24 बाय 30 इंच व त्यापुढे आवश्यकतेनुसार असावे. कॅनव्हास, ड्रॉइंग पेपर, हॅन्डमेड पेपर, फॅब्रियानो पेपर, कॅन्सन पेपर, माउंट बोर्ड इत्यादी आवडीच्या माध्यमातून सरफेसवर चित्रे काढणे अपेक्षित आहे. चित्रे डिस्प्ले करण्यासाठी कलाकारांनी हुकची सोय करून देणे आवश्यक आहे. ड्रॉइंग पेपरवर चित्र साकारल्यास सदरील चित्र व्यवस्थितरित्या बोर्डवर चिटकून जमा करावे. एका कलाकाराचे एकच चित्र स्वीकारले जाईल. चित्रकला महाविद्यालय, विद्यापीठ अंतर्गत शिक्षण घेत असल्यास विद्यार्थ्यांनी चित्राच्या मागे स्वतःचे पूर्ण नाव, मोबाईल नंबर, घरचा संपूर्ण पत्ता, ईमेल ऍड्रेस तसेच विद्यापीठ, महाविद्यालयाचे ओळखपत्र झेरॉक्स चिटकवणे बंधनकारक आहे. ओळखपत्र नसल्यास त्या विद्यार्थ्यास खुल्या गटात गृहीत धरले जाईल. खुल्या गटातील स्पर्धकांनी चित्राच्या मागे खुल्या गटाचा उल्लेख करून स्वतःचे पूर्ण नाव, मोबाईल नंबर घरचा पूर्ण पत्ता, ई-मेल ऍड्रेस लिहिणे आवश्यक आहे. सादर करण्यात येणाऱ्या कलाकृतीमध्ये आक्षपार्ह, राष्ट्रीय अस्मितेच्या प्रतीकाची, धर्म-जात, पंत याची भावना दुखावली जाणार नाही, याची दक्षता स्पर्धकांनी घेणे आवश्यक आहे. दि. 20 जुलै 2024 पर्यंत चित्रे स्वीकारली जातील. स्पर्धेसाठी प्रवेश फी निशुल्क आहे. स्पर्धकांनी जमा केलेल्या कलाकृतींवर आयोजकांचा अधिकार असेल. स्पर्धेतील सर्व चित्रे प्रदर्शनासाठी ठेवले जातील. प्रदर्शनाची तारीख स्पर्धकांना कळविण्यात येणार आहे. परगावच्या कलाकारांनी आपली कलाकृती व्यवस्थित पॅकिंग करून पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, ललितकला व कला संकुल येथे प्रत्यक्ष व कुरियरद्वारे पाठवून स्पर्धेत भाग घ्यावे. सहभागी सर्व स्पर्धकांना प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.
अधिक माहिती व प्रवेश नोंदणीसाठी मो. 9637963939 अथवा 9420490672 या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
प्रथम क्रमांकास 20 हजार व 10 हजाराचे बक्षीस
खुला गट प्रथम क्रमांकास 20 हजार रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. द्वितीय क्रमांकास 11 हजार रुपये, तृतीय क्रमांकास 7 हजार रुपये आणि उत्तेजनार्थला 5 हजार रुपयांचे रोख बक्षीस मिळणार आहे. विद्यापीठ व महाविद्यालयीन विद्यार्थी गटातील प्रथम क्रमांकास 10 हजार रुपये, द्वितीय क्रमांकास 7 हजार रुपये तर तृतीय क्रमांकास 5 हजार रुपये आणि उत्तेजनार्थला तीन हजार रुपयांचे बक्षीस मिळणार आहे. दि. 20 जुलै 2024 पर्यंत चित्रे स्वीकारली जातील. स्पर्धेसाठी प्रवेश फी निशुल्क आहे.