सोलापूर दि.21 (जिमाका) :- महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग व महाराष्ट्र कला संस्कृती मंच यांच्या संयुक्त विद्यमाने कार्तिकीची वारी पंढरीच्या दारी पर्यावरण शिक्षणाचे धडे देई घरोघरी या उपक्रमाचे आयोजन कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने आयोजित करण्यात येत असल्याचे उप प्रादेशिक अधिकारी निखिल मोरे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
पंढरपूरच्या वारीला शतकानुशतके भागवत संप्रदायाची परंपरा आहे. दरवर्षी आषाढी एकादशीच्या दिवशी साजरी होणारी आषाढ वारी आणि कार्तिक महिन्याच्या एकादशीला साजरी होणारी कार्तिकी वारी ही वारकरी संप्रदायासाठी आनंदाची पर्वणी असते. संपूर्ण विश्वात सातशे वर्षाहूनही अधिक काळ वारकरी संप्रदायाची ही वारी दिवसेंदिवस लोकाभीमुख चळवळ म्हणून वृध्दींगत होत आहे.
या वर्षी कार्तिकी एकादशी दि. 23 नोव्हेंबर 2023 रोजी साजरी होणार आहे. कार्तिकी एकादशीच्या पुर्व संध्येला राज्याचे मा. उपमुख्यमंत्री महोदय यांच्या शुभ हस्ते पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहाच्या परिसरात या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी ह.भ.प पुर्वा काणे, संगीत नाटक अकादमी विजेत्या भारुडकार चंदाबाई तिवाडी, झी मराठी फेम शाहिर देवानंद माळी हे लोककलावंत त्यांच्या पथकासह सहभागी होणार आहेत.
या कार्यक्रमात किर्तन, प्रवचन, भारुड, पोवाडा अशा लोककला प्रकारांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती केली जाणार आहे. या उपक्रमात प्लॅस्टिक पिशवीचा वापर टाळा, विजेची बचत (सिएफएल बल्बचा वापर करा) पाण्याचा अतिरिक्त वापर टाळून पाण्याचे नियोजन करा, प्लास्टीकचा वापर टाळा, वृक्षतोड टाळा, सेंद्रिय खताचा वापर करुन शेती करा, घरातील प्रत्येक माणसाने वर्षभरात किमान एक झाड लावावे व त्याचे संगोपन करावे, शेतीसाठी पाण्याचा अतिरिक्त उपसा न करता मर्यादित कालावधीत शेतीपंप चालवावा, ओला कचरा सुका कचरा वेगळा करुन ओल्या कचऱ्यातून सेंद्रिय खताची निर्मिती करावी अशा विविध संदेशांची पखरण लोक कलांच्या माध्यमातून केली जात असते. वारीत सहभागी होणाऱ्या ग्रामीण जनतेला लोककला प्रकार हा अत्यंत जवळचा असल्याने या माध्यमातून लोकजागृतीचे नविन साधन समोर आले आहे व ते यशस्वी होत असल्याचे पत्रकात नमूद आहे.