सोलापूर : हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, वालचंद आर्टस अॅण्ड सायन्स महाविद्यालय आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूरचे उद्यम इनक्युबेशन सेंटर यांच्या संयुक्त विद्यमानाने विद्यार्थ्यांना उद्योगशील बनविण्यासाठी उद्यमदीप (ट्रेड फेअर व स्टार्टअप एक्स्पो) चे आयोजन करण्यात आले आहे. उदयोजकता विकास कार्यक्रमाअंतर्गत उद्यमशील मंचातर्फे शनिवार दिनांक २६ ऑक्टोंबर २०२४ व रविवार दिनांक २७ ऑक्टोंबर २०२४ रोजी सकाळी ९.०० ते रात्री ९.०० वाजेपर्यंत उद्यमदीप अंतर्गत विद्यार्थ्यांनी बनविलेल्या वस्तूचे प्रदर्शन व विक्रीचे आयोजन केले आहे. स्टार्टअप संस्कृतीला प्रोत्साहन देणे आणि विद्यार्थ्यांमध्ये नवोन्मेष आणि उद्यमशीलता वृद्धिंगत करण्यासाठी एक सक्षम व्यवस्था तयार करण्यासाठीचा हा उपक्रम दरवर्षी महाविद्यालयामार्फत राबवण्यात येतो.
विद्यार्थ्यांनी फक्त पदवी पुरते मर्यादित न राहता वर्तमान आणि भविष्याची गरज ओळखून आपल्यातील कौशल्य विकसित करुन उद्यमशील बनले पाहिजे या उददेशाने हा उपक्रम राबविला जात आहे. सदर एक्स्पो मध्ये अनेक गुंतवणूकदार सहभागी होणार असून एक्स्पो मधील सर्वोत्तम स्टार्टअप मध्ये ०१ करोड रुपयापर्यत गुंतवणूक करण्याचा त्यांचा मानस आहे.
उद्यमदीप या उपक्रमाचे उदघाटन शनिवार दिनांक २६ ऑक्टोबर २०२४ रोजी सकाळी ठीक ९.०० वाजता डॉ. प्रकाश महानवर (कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ, सोलापूर) यांच्या हस्ते व वालचंद शिक्षण समुहाचे सर्व विश्वस्त, वालचंद समुहातील सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य यांच्या उपस्थितीत होणार आहे.
सदर उपक्रमात दिपावली सणासाठी लागणाऱ्या सर्व वस्तू पणती, आकाश दिवे, सजावट साहित्य, फराळाचे पदार्थ, मसाले, कपडे इत्यादी साहित्य एकाच छताखाली माफक दरात विक्रीसाठी उपलब्ध असणार आहेत. सोलापूर शहर, ग्रामीण भागातील विद्यार्थी, पालक व नागरिक यांना यासाठी आमंत्रित करण्यात येत आहे. तसेच सर्वाना प्रवेश विनामुल्य असून सदर उपक्रमास भेट देवून भरभरुन खरेदी करण्याचे व विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन प्राचार्य डॉ. सत्यजित शहा, प्राचार्य डॉ. संतोष कोटी यांनी केले आहे.