पु.अ.हो.सोलापूर विद्यापीठ सोलापूर संलग्नित व श्रीराम ग्रामीण संशोधन व विकास प्रतिष्ठान संचलित लोकमंगल विज्ञान व उद्योजकता महाविद्यालयांच्या राष्ट्रीय सेवा योजनेचे विशेष श्रमसंस्कार शिबीर मौजे उंडेगाव ता बार्शी या ठिकाणी सुरू असून शिबिराच्या पाचव्या दिवशी दि.२९ जानेवारी रोजी सिद्धेश्वर ब्लड बँक सोलापूर यांच्यावतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
सदर शिबिराचे उद्घाटन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सतीशकुमार देवकर व गावचे सरपंच श्री प्रकाश गुंड यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ सतीशकुमार देवकर यांनी रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान असून हे सर्वात महत्वाचे सामाजिक व नैतिक कर्तव्य असल्याचे सांगून सर्वांनी रक्तदान करण्यासाठी आवाहन केले. गावचे सरपंच श्री प्रकाश गुंड यांनी यावेळी बोलताना रक्तदान शिबिरासारखा महत्त्वपूर्ण उपक्रम गावात आयोजित केल्याबद्दल महाविद्यालयाचे आभार मानले.सदर रक्तदान शिबिरामध्ये एकूण ४२ रक्तदात्यांनी रक्तदान केले.
यावेळी उपस्थित मान्यवर, ग्रामस्थ व रक्तदाते यांचे सहकार्याबद्दल राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा समाधान कदम यांनी विशेष आभार व्यक्त केले.यावेळी सिध्देश्वर ब्लड बँकेचे डॉ गलियाल व त्यांचे सहकारी, महाविद्यालयाचे पदव्युत्तर विभाग प्रमुख डॉ किरण जगताप, जैवतंत्रज्ञान विभाग प्रमुख प्रा अंकुश गोरट्याल, प्रा साक्षी बिराजदार, प्रा कार्तिकी वेदपाठक,गावातील ग्रामस्थ व विद्यार्थी स्वयंसेवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.