सोलापूर : आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा २०२३ निमित्त पंढरपुर शहर व परिसरात सार्वजनिक शांतता राखण्यासाठी पंढरपूर शहर व शहरापासून ५ कि.मी. त्रिज्या परिसरातील सर्व देशी विदेशी मद्य विक्री दुकाने दि. २८ ते ३० जून या कालावधीत पूर्ण दिवस बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी दिले आहेत. तसेच, दिनांक १ ते ३ जुलै या कालावधीत पंढरपूर शहर व शहरापासून ५ कि.मी. त्रिज्या परिसरातील सर्व देशी व विदेशी मद्य विक्री व ताडी दुकाने सायंकाळी ५.०० वाजेपासून बंद ठेवण्याचे आदेशही देण्यात आले आहेत..
जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमातील कलम १४२ अन्वये याबाबतचे आदेश जारी केले आहेत. तसेच, आषाढी एकादशी पंढरपूर यात्रा २०२३ निमित्त संत श्री तुकाराम महाराज व संत श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी मुक्कामाच्या ठिकाणी (गावात/शहरात) सार्वजनिक शांतता राखण्याच्या पार्श्वभूमिवर दिनांक २३ जून रोजी नातपुते पूर्ण दिवस बंद, दिनांक २४ जून रोजी माळशिरस, अकलुज पूर्ण दिवस बंद, दिनांक २५ जून रोजी वेळापूर, बोरगांव, श्रीपूर, माळीनगर पूर्ण दिवस बंद, दिनांक २६ जून रोजी भंडीशेगाव, पिराची कुरोली पूर्ण दिवस बंद, दिनांक 27 जून रोजी वाखरी पूर्ण दिवस बंद राहील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुध्द कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे आदेशात म्हटले आहे.