केगाव दुर्घटनेतील काळविटांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात
सोलापूर : जागतिक पाणथळ भूमी दिनाच्या निमित्ताने सोलापूर महानगरपालिका, पोलीस प्रशिक्षण केंद्र आणि इको फ्रेंडली क्लब यांच्यावतीने नेचर वॉक आणि पक्षी तज्ञांशी संवाद उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. केगाव येथील पोलीस प्रशिक्षण केंद्रात असलेल्या पाणथळ परिसरात शुक्रवारी सकाळी हा उपक्रम पार पडला. प्रारंभी केगाव परिसरात मृत्युमुखी पडलेल्या काळविटांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
यावेळी पोलीस प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य डॉ. वैशाली कडूकर, सोलापूर महानगरपालिकेचे उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांची प्रमुख उपस्थिती होती. ज्येष्ठ पक्षी अभ्यासक डॉ. अरविंद कुंभार, पर्यावरण अभ्यासक शिवानंद हिरेमठ यांनी उपस्थित निसर्गप्रेमींना मार्गदर्शन केले. निसर्गरम्य वातावरणात निसर्ग परिक्रमा करून सर्वजण आनंदून गेले होते. पाणथळ परिसर आणि पक्षी जगताविषयी माहिती सर्वांनी जाणून घेतली.