येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर जिल्ह्याचा covid-19 चा १५ मे रोजी चा अहवाल प्राप्त झाला असून जिल्ह्यामध्ये १८६५ व्यक्तींना नव्याने कोरोना झाला आहे. शुक्रवारी रात्री बारा वाजेपर्यंत संपलेल्या २४ तासात रुग्णालयातून कोरोना मुक्त होऊन घरी परतलेल्या व्यक्तींची संख्या २०४८ आहे . या कालावधीत ३५ व्यक्तींचा कोरोनामुळे मृत्यू ओढवला आहे. चिंतेची बाब म्हणजे मृतांमध्ये दक्षिण सोलापूर तालुक्यातील हिपळे गावातील २५ वर्षाच्या तरुणाचा समावेश आहे. या तरुणास ९ मे रोजी रात्री पावणे दहा वाजता सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते . त्याचा १० मे रोजी सकाळी आठ वाजता कोरोनामुळे मृत्यू ओढवला . मोहोळ तालुक्यातील अंकोली येथील ३८ वर्षांची महिला आणि माळशिरस तालुक्यातील तांदुळवाडी येथील ३७ वर्षांची व्यक्ती असे एकूण तीन जण ४० वर्षाखालील मृत्युमुखी पडले आहेत. तालुकानिहाय कोरोना बाधित यांचा गोषवारा घेतला असता पंढरपूर तालुक्यात सर्वाधिक ४४७ रुग्ण आढळले आहेत. त्या पाठोपाठ मंगळवेढा तालुक्यात ३१०, माळशिरस तालुक्यात २५६, माढा तालुक्यात २०२, बार्शी तालुक्यात १७५, मोहोळमध्ये १४६ आणि करमाळा तालुक्यात ११४ व्यक्तींना नव्याने कोरोनाची बाधा झाली आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील व्यक्ती अजूनही कोरोनाची लक्षणे दिसायला लागल्यानंतर तातडीने उपचार करून घेण्यासाठी धजावत नसल्याचे चित्र आहे. जमावबंदी आणि संचारबंदीचे निर्बंध कडक केल्यानंतर देखील नवीन कोरोनाबाधीतांचा आकडा जिल्ह्यामध्ये कमी होण्यास तयार नसल्याने जिल्हा प्रशासनाच्या चिंतेत वाढ झाली आहे . विधानसभेची पोटनिवडणूक झालेल्या पंढरपूर आणि मंगळवेढा या दोन तालुक्यात अजूनही मोठ्या प्रमाणावर कोरोनाबाधित वाढत आहेत.