येस न्युज मराठीव नेटवर्क : गेल्या काही दिवसांमागून वादग्रस्त वक्तव्ये करून राजकारणात राळ उडवणारे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांची जीभ पुन्हा एकदा घसरली आहे. ज्याची बायको पळते, त्याचेच नाव मोदी ठरते, असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्यावर करून त्यांनी पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फोडले आहे. पटोले यांनी नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरी येथे सुरू असलेल्या काँग्रेस प्रशिक्षण शिबिराच्या समारोपाला हजेरी लावली. मात्र, जाता-जाता पुन्हा एकदा त्यांनीच आपल्याच वादग्रस्त वक्तव्याचा वाद शमायचा वाटही न पाहता, त्यात पुन्हा एक काडी टाकली. त्यामुळे येणाऱ्या काळात पटोलेविरुद्ध भाजप असे चित्र राज्याच्या राजकारणात दिसणार आहे.
पटोलो यांनी काहीच दिवसांपू्र्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. तसा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यात ते म्हणतात, “मी का भांडतो? मी आता मागील 30 वर्षापासून राजकारणात आहे. लोकं पाच वर्षात आपल्या एका पिढीचा उद्धार करुन टाकतात. शाळा, कॉलेज हे करुन आपल्या एक-दोन पिढीचा उद्धार करुन टाकतात. मी एवढ्या वर्षाच्या राजकारणात एक शाळा नाही घेतली. एक ठेकेदारी नाही केली. जो आला त्याला मदत करतो. म्हणून मी मोदीला मारु शकतो, त्याला शिव्या देऊ शकतो आणि म्हणून मोदी माझ्या विरोधात प्रचाराला आला. एक प्रमाणिक नेतृत्व तुमच्या इथे आहे….”असं आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य नाना पटोले यांनी केल्याचं या व्हिडीओमध्ये पाहायला आणि ऐकायला मिळत आहे.
आपल्या वादग्रस्त वक्तव्यावर स्पष्टीकरण देतानाही पटोले यांनी आणखी एक वादग्रस्त वक्तव्य केले होते. ते म्हणाले, “त्या भागात निवडणुका चालू आहेत. आमच्या भागात मोदी नावाचा एक गावगुंड आहे. त्याची तक्रार गाववाले करत होते. मी त्यांना सांगत होतो की घाबरू नका मी तुमच्या सोबत आहे आणि मला कुणाला घाबरण्याची गरज नाही. त्यावर ते वाक्य आहे. पंतप्रधान मोदींबद्दल ते वाक्य नाही. या प्रकरणाचा बाऊ केला जात असेल तर भाग वेगळा आहे. तुम्ही तो व्हिडीओ पाहा, त्यात लोकांच्या तक्ररीनंतर लोकांमध्ये मी बोललो आहे. मी कुठल्या भाषणात मी हे बोललो नाही. गावगुंडाची तक्रार लोक करत होते आणि त्यांना मी आश्वस्त करत होतो. या व्हिडीओत मी पंतप्रधानांचा उल्लेख केला नाही किंवा नरेंद्र असा शब्दही वापरला नाही. मोदी नावाचा गावगुंड आहे, त्याबद्दल मी बोललो आहे”, असे स्पष्टीकरण पटोले यांनी टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिले होते.
इगतपुरी येथे पटोले म्हणाले की, गावगुंडांना गावगुंडच दिसतील. त्यांची आता हलाखीची परिस्थिती झालीय. लोक भाजपवर हसत आहेत. ज्याची बायको पळते, त्याचे नाव मोदी ठरते. असे हे झाल्यावर आता काय बाकी राहिले आहे, असे म्हणत त्यांनी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकात पाटील यांच्यावरही तोडसुख घेतले. पुढे ते म्हणाले की, नाना पटोले म्हणाले की, भाजप आणि शिवसेना यांची अनेक वर्षे मुंबई महापालिकेत सत्ता राहिली आहे. भाजप हा आमचा मुख्य शत्रू आहे. त्यामुळे आमची त्याच पद्धतीची भूमिका आणि रणनीती राहणार आहे, असा इशाराही त्यांनी दिला. मात्र, या वक्तव्यामुळे येणाऱ्या काळात वाद वाढणार यात शंका नाही.