सोलापूर : तब्बल ४० तालवाद्ये अत्यंत कौशल्याने वाजवणारे सोलापूरचे प्रख्यात तालवादक नागेश भोसेकर यांना बालगंधर्व परिवार पुरस्कार पुणे येथे प्रदान करण्यात आला. बालगंधर्व परिवार महाराष्ट्रतर्फे पुणे येथील बालगंधर्व रंगमंदिरात हा कार्यक्रम झाला.
बालगंधर्व रंगमंदिर ट्रस्ट व पुणे महानगरपालिका यांच्या वतीने बालगंधर्व रंग मंदिराच्या ५७ व्या वर्धापन दिनानिमित्त हा पुरस्कार देण्यात आला. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर, अभिनेत्री दिपाली सय्यद, चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, ॲड. रुपाली ठोंबरे, अभिनेते किशोर महाबोले, नृत्य दिग्दर्शक योगेश देशमुख यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.
यावेळी नागेश भोसेकर म्हणाले, ज्या रंगमंदिराच्या केवळ मंचानेच नाही तर संपूर्ण वास्तुने मला कलाक्षेत्रात उभे राहण्यास मदत केली, त्या वास्तुत कलाक्षेत्रात करत असलेल्या कामाबद्दल कौतुकाची थाप बालगंधर्व परिवाराने दिली ही माझ्याकरिता अत्यंत समाधानाची बाब आहे. याप्रसंगी निर्माते दादा साळुंखे, प्रशांत बडवे, अमोल धाबळे आदी उपस्थित होते.