सोलापूर, (प्रतिनिधी):- संगीत क्षेत्रात उल्लेखनीय आणि दुर्मिळ अशी कामगिरी केल्याबद्दल ऑल इंडिया रेडिओ कडून सोलापूरच्या सुंद्रीवादक भिमण्णा जाधव यांना टॉप ग्रेड पुरस्कार जाहिर झाला त्या निमित्त महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर यांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
सोलापूरच्या मातीत जन्म झालेल्या सुंद्रीची सेवा गेल्या 5 पिढ्यापासून जाधव परिवार करीत आहे. स्वर्गिय बाबुराव जाधव यांनी जन्माला घातलेल्या सुंद्री या वाद्याला जगभरात नेत असताना जाधव परिवारातील चौथ्या पिढीने सोलापूरचा गौरवा वाढवण्याचे कार्य केले आहे. देशातील सर्व राज्यात झालेल्या सर्व्हे मध्ये दुर्मिळ आणि वैशिष्ट्यपूर्ण असलेले वादक म्हणून सोलापूरचे भिमण्णा जाधव यांना भारत सरकारच्या वतीने ऑल इंडिया रेडिओकडून संगीत क्षेत्रातील सर्वोच्च असे टॉप ग्रेड पुरस्कार जाहिर केले. यापुर्वी हा पुरस्कार पंडीत भिमसेन जोशी, उस्ताद बिस्मील्लाह खान यांच्यासारख्या ज्येष्ठ श्रेष्ठ कलावंताना हा पुरस्कार मिळाला आहे. यामध्ये सोलापूरच्या सुंद्रीवादक भिमण्णा जाधव यांचा समावेश झाला हे सोलापूरच्या दृष्टीने गौरवास्पद आहे म्हणून महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने कार्याध्यक्ष प्रशांत बडवे, कार्यवाह जितेश कुलकर्णी, सदस्य अविनाश महागांवकर, अभय जोशी, विनायक होटकर यांनी भिमण्णा जाधव यांच्या निवासस्थानी जावून त्यांना शाल, पुष्पगुच्छ, हार आणि पुस्तक देवून त्यांचा सत्कार केला. यावेळी बोलताना प्रशांत बडवे म्हणाले सुंद्रीच्या माध्यमातून सोलापूरचे नाव सातासमुद्रापार नेत जाधव परिवाराने आता मोठे यश मिळवले आहे. भिमण्णा जाधव हे अत्यंत प्रतिकुल परिस्थितीत आपली कला जपत आहेत असेही ते म्हणाले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार जितेश कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
सुंद्रीचा जन्म आणि जाधव यांच्या 5 पिढ्या
सनई वादक बाबुराव जाधव हे आपला चरितार्थ चालावा म्हणून टोपली बनवायचे लोक टोपली घेवून जात आणि काम संपले की ते परत आणून देत असे एके दिवशी एका टोपलीत त्यांना यंत्रमाग व्यवसायात वापरली जाणारी सुताची बॉबीन आढळून आली ते त्यांनी नीट निरखून पाहिले असता त्यांनी त्याला पुंगी सारखे वाजवण्यास सुरूवात केले त्यातच त्यांना वेगवेगळे आवाज आणि स्वर जाणवले. त्यानंतर त्यांना अक्कलकोट संस्थानचे राजे फत्तेसिंह महाराज यांच्या राज्याभिषेकादरम्यान बोलावण्यात आले त्यांनी ते बॉबीन वाद्य घेवून वाजवले असता त्यातून प्रभावित होवून राजे फत्तेसिंह महाराज यांनी त्या बॉबीन वाद्याचे सुंद्री असे नामकरण केले. सुंद्री बाबुराव जाधव यांनी जन्माला घातलेले सुंद्री वाद्य त्यांच्या नंतर सिद्राम जाधव, चिदानंद जाधव आणि आता भिमण्णा जाधव यांनी तशीच पुढे सुरू ठेवली आहे भिमण्णा जाधव यांच्या बरोबरच व्यंकटेश कुमार आणि कलाश्री या दोघांनी हे सुंद्री वादन सुरू ठेवले आहे जवळपास 5 पिढ्या पासून सुंद्रीची सेवा जाधव परिवार करीत आहे त्यातूनच त्यांना टॉप ग्रेड हा सर्वोच्च पुरस्कार मिळाला आहे.