विद्यापीठ व महाविद्यालयीन कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा दुसरा दिवस
सोलापूर – येत्या अधिवेशनात विदयापीठ व महाविद्यालयीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात आवाज उठवणार असल्याचे आश्वासन आमदार प्रणिती शिंदे यांनी शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना दिले. विद्यापीठ व महाविद्यालतीन शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा मंगळवारी दुसरा दिवस होता. आमदार शिंदे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात आंदोलनस्थळी भेट दिली, त्यावेळी त्या बोलत होत्या.
दुसऱ्या दिवशी विद्यापीठ संघटनेचे अध्यक्ष सुनील थोरात, महासंघ उपाध्यक्ष सोमनाथ सोनकांबळे, प्रतिनिधी संतोष क्षीरसागर, सरचिटणीस रविकांत हुक्कीरे, उपाध्यक्ष कांचन आघाव यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली. तसेच आंदोलनस्थळी विद्यापीठाचे व्यवस्थापन परिषद सदस्य राजाभाऊ सरवदे, पदमजादेवी मोहिते पाटील, सचिन गायकवाड, डॉ सुशील कुमार शिंदे, डॉ शिरीष शिंदे, माजी सदस्य डॉ. हनुमंत आवताडे, विद्यापीठ परिसर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष डॉ. गौतम कांबळे, सचिव डॉ. प्रभाकर कोळेकर आदींनी भेट देऊन आंदोलनास पाठिंबा व्यक्त केला.
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे प्रश्न उपस्थित करणार विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्याकडे शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन पश्चिम महाराष्ट्र राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अध्यक्ष सुहास कदम यांनी दिले.
शहरातील सर्व महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अध्यक्ष दत्ता भोसले यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने केली. यावेळी भेट दिल्यानंतर त्यांनी हे आश्वासन दिले. तसेच काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे, उपाध्यक्ष सुनील रसाळे, सिनेट सदस्य गणेश डोंगरे आदींनी भेट देऊन पाठिंबा दिला. हा प्रश्न आमदार प्रणिती शिंदे मार्फत मार्गी लावू, असे त्यांनी आश्वासन दिले. त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना कॉलेज कर्मचारी युनियनच्या पदाधिकाऱ्यांनी निवेदन दिले. यावेळी महाराष्ट्र राज्य महाविद्यालय शिक्षकेतर कर्मचारी महासंघाचे उपाध्यक्ष राजेंद्र गोटे, विभागीय सचिव अजितकुमार संगवे, कॉलेज कर्मचारी युनियनचे अध्यक्ष दत्ता भोसले, उपाध्यक्ष आनंद व्हटकर, खजिनदार राहुल कराडे, दिपाली करजगीकर, आरती देशक, संजीवनी सादुल, नियाझ शेख, सुभाष मेंगरती आदी उपस्थित होते.