येस न्युज मराठी नेटवर्क : नागपूरमध्ये करोना तीन लाटा संपल्यानंतर दोन वर्षांनी हिवाळी अधिवेशन पार पडतं आहे. या अधिवेशन काळातच एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. नागपूरच्या सर्व शासकीय कार्यालयांमध्ये मास्क लावणं आता बंधनकारक असणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी तसं पत्रक काढलं आहे. शासकीय आणि निमशासकीय कार्यालयातले सगळे अधिकारी आणि कर्मचारी यांना आणि येणाऱ्या सगळ्या नागरिकांनाही मास्क घालणं बंधनकारक असणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी काय म्हटलं आहे?
नागपूरमधल्या सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांमध्ये अधिकारी आणि कर्मचारी यांच्यासाठी मास्कसक्ती करण्यात आली आहे. तसंच या कार्यालयांमध्ये येणाऱ्या नागरिकांनीही मास्क लावणं बंधनकारक असणार आहे. लवकरच सर्व नागरिकांसाठीही आम्ही असे आदेश काढणार आहोत अशीही माहिती जिल्ह्याधिकाऱ्यांनी एका वाहिनीशी बोलताना दिली. करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत नागपूरमध्ये करोनाचे रूग्ण वाढले होते. त्या पार्श्वभूमीवर आता चौथ्या लाटेचा धोका लक्षात घेऊन शासकीय आणि निमशासकीय कार्यालयांसाठी मास्क लावणं बंधनकारक करण्यात आलं आहे.