तामिळनाडू राज्यातील आदिवासी भागात राहणारे व साप पकडण्यात तरबेज असणारे मासी सदाइयान आणि वैदीवेल गोपाल या द्वयीना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. तामिळनाडूतील इरुला जमातीतील हे निवासी असून प्रजासत्ताक दिन 2023 च्या निमित्ताने दोघांना देशातील चवथ्या सर्वोच्च नागरी पूरस्कार असणाऱ्या पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले आहे. हे दोघे सर्पमित्राना प्रशिक्षण देण्यासाठी एकत्रितरित्या पूर्ण जगामध्ये यात्रा करत असतात. त्यांनी अजगर पकडण्यासाठी स्वतःची अशी एक प्रभावी यंत्रणा विकसित केली आहे. ही कला त्यांना त्यांच्या पूर्वजाकडून मिळाली असे ते सांगतात. या समुदायाचे लोक तामिळनाडूतील देणाकनिकोट्टईच्या जवळील जंगलात समूहाने राहतात तसेच साप व उंदीर पकडण्यात तरबेज असल्याचे समजते.
2017 रोजी अमेरिकेने बर्मन जातीच्या असंख्य प्रमाणात वाढलेल्या अजगरांना पकडण्यासाठी मासी सदाइयान आणि वैदीवेल गोपाल या दोघांना रेस्क्यूसाठी पाचारण केले होते. त्यावेळी या दोघांसाठी अमेरिकेने तब्बल 44 लाख रुपये मोजले होते. या दोघांनी मिळून तब्बल 27 अजगरांना पकडले होते. त्यातील दोन अजगर तर तब्बल 16 फुट लांबीचे होते. त्यांच्या या थक्क करणाऱ्या कामगिरीमुळे फ्लोरिडा फिश अँड वाइल्डलाईफ कंजर्वेशन कमिशनच्या अधिकाऱ्यांना त्यांचे कौतुक केले होते.
या दोघांना जेव्हा पद्मश्री पुरस्कार मिळाल्याचे कळाले तेव्हा सुद्धा ते एका ठिकाणी साप रेस्क्यू करीत होते. ही बातमी त्यांना कळाल्यानंतर अक्षरशः विश्वास बसेनासा झाला होता. हा पुरस्कार म्हणजे आमच्या कठोर मेहनतीचे फळ असल्याचे ते सांगतात.