बीड : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचा दसरा मेळावा बीडमधील नारायण गडावर पार पडला. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षणाच्या मुद्यावरुन मनोज जरांगे पाटलांनी सरकारला पुन्हा एकदा इशारा दिलाय. आचारसंहितेच्या आत निर्णय घ्या. आचारसंहिता लागल्यानंतर मुख्य भूमिका जाहीर करणार, असं मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत. शेतकऱ्यांना पीकविमा नाही, आरक्षण नाही. कैकाडी, लिंगायत समाजाला काही दिलं जात नाही. आपणच फक्त असा समुदाय आहे , जो सर्वांसाठी लढतोय, असंही जरागेंनी सांगितलं.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, मला आणि माझ्या समाजाला शब्द पाहिजे आणि उत्तर पाहिजे. काल 17 जाती ओबीसीमध्ये गेल्या आता तुम्हाला धक्का लागत नाही का? तुम्हीच म्हणालात. ज्या वेळी आम्ही आरक्षण मागितलं. त्यावेळी एकजण म्हणाला, महाविकास आघाडीमधून लिहून घ्या. आता मला उत्तर द्यायचं. तुम्ही 17 जाती ओबीसीमध्ये घातल्या. तुम्ही महाविकास आघाडीमधून लिहून घेतलं का? ज्यावेळी आपण मागत होतो, त्यावेळेस म्हणाले धक्का लागतो. आता एकजण बोलत नाही, धक्का लागला म्हणून.
पुढे बोलताना मनोज जरांगे पाटील म्हणाले, अन्यायाविरुद्ध लढण्याची शिकवण प्रत्येक ऋषीने दिली. वारकरी संप्रदायाने दिली आहे. आपल्याला म्हणयाचे हुशार नेते आहेत. हिंदू धर्माने अन्यायाविरुद्ध लढायला शिकवलं. अन्याय सहन करायचा नाही. अन्याय होत असेल न्यायासाठी उठाव करायचा. सरकारकडे अन्यायाविरुद्ध मागणी आहे. गोरगरिब मराठ्यांना आरक्षण द्या.
काही जणांना सांगितलं. तुमच्यामुळे आमच्या आरक्षणाला धक्का लागतो. तुमच्यामुळे आमचं आरक्षण कमी होतं. मी इमानदार माणूस आहे. मला पूर्ण घेरलं आहे. या गडावर एक शब्द खोटं बोलणार नाही. मला सांगावं लागतय, माझा नाइलाज आहे. मला होणाऱ्या वेदना समाज सहन करत नाही. माझ्या समाजाचा त्रास मला सहन होतं नाही. मला त्रास झाला तर माझा समाज रात्रंदिवस रडतो. माझ्या समाजाच्या लेकराला तुमच्यामुळे कलंक लागू देऊ नका. पक्ष पक्ष करु नका. सारखं नेता नेता करु नका. तुमच्या लेकराच्या अंगावर गुलाल टाका. यांनी मला असं घेरलंय की, आरक्षणाची मागणी 14 महिन्यांपासून आहे. एकही मागणी मान्य केली नाही. 14 महिने झाले गोरगरिबांसाठी आरक्षणाचा लढा सुरु आहे, असंही जरांगे पाटील यांनी नमूद केलं.