सोलापूर : वारस हक्काच्या अर्जावर तक्रारदार यांच्या बाजूने निकाल देण्यासाठी २० हजाराची लाच घेताना करमाळा तहसील कार्यालयातील महिला मंडल अधिकारी शाहिदा युनूस काझी (वय ४२ रा .करमाळा) हिला अँटीकरप्शनच्या पथकाने रंगेहात पकडून गुन्हा दाखल केला. ही कारवाई उमरड (ता.करमाळा) येथील मंडल अधिकाऱ्याच्या कार्यालयात मंगळवारी दुपारच्या सुमारास करण्यात आली.
जेऊर परिसरातील एका तक्रारदाराने वारस नोंद साठी उमरड येथील मंडल अधिकाऱ्याकडे हरकतीचा अर्ज सादर केला होता . त्या अर्जाची सुनावणी करून तक्रारदाराच्या बाजूने निकाल देण्यासाठी शाहिदा काझी हिने २५ हजाराची लाच मागितली होती. तडजोडीनंतर २० हजार रुपये देण्याचे ठरले होते .दरम्यान तक्रारदाराने सोलापुरातील अँटीकरप्शन कार्यालयाशी संपर्क साधून तक्रार नोंदवली होती. त्याप्रमाणे पोलिसांनी आज दुपारी उमरड येथील कार्यालयात सापळा रचला होता. तक्रारदाराकडून लाचेची रक्कम घेत असताना पोलिसांनी काझी हिला ताब्यात घेऊन करमाळा पोलिसात गुन्हा दाखल केला. ही कारवाई अँटीकरप्शनचे पोलीस उपअधीक्षक गणेश कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, पोलीस अंमलदार स्वामीराव जाधव,अतुल घाडगे, सलीम मुल्ला, शाम सुरवसे आदींनी पार पडली .