सोलापूर : लोकमंगल फाऊंडेशनच्या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या उपक्रमाचे हे १७ वे वर्ष असून या वर्षीचा विवाह सोहळा रविवार, दि. २७ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ६.३० वाजता विजापूर रोडवरील शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या मैदानावर होणार आहे, अशी माहिती लोकमंगल फाऊंडेशनचे अध्यक्ष रोहन देशमुख यांनी दिली.
या वर्षीच्या विवाह सोहळयात 1 जोडप्यांचे विवाह होणार असून त्यात ३ वौध्द जोडपी आहेत. या विवाह सोहळयात विवाह होणा-या जोडप्यांना रूखवत (संसारोपयोगी भांडी ), मणी-मंगळसूत्र आणि आवश्यक ते कपडे फाऊंडेशनतर्फे दिले जातील. विवाहापूर्वी वधू-वरांचा मेकअप त्याच ठिकाणी केला जाईल आणि अक्षता सोहळयापूर्वी त्यांची रिक्षामधून वरात काढली जाईल. याचवेळी नवविवाहित जोडप्यांना संसार सुखाचा करण्याबाबत टिप्स देणारा समुपदेशनाचा कार्यक्रमही आयोजित केला जाईल त्यात गणेश शिंदे, पदमजा गांधी यांचे मार्गदर्शन लाभेल. या कार्यक्रमास आ. सुभाष बापू देशमुख यांची उपस्थिती असेल आणि ते सर्व जोडप्यांना शुभाशिर्वाद देतील. या विवाह समारंभात सर्व वधू-वरांच्या व-हाडींना भोजनाची सोय करण्यात आली आहे.
या वर्षीचे वैशिष्ट्य म्हणजे गेल्या १६ वर्षात विवाह झालेल्या एकूण ३००० जोडप्यांना विशेष निमंत्रण देऊन पाचारण करण्यात आलेले आहे, त्या सर्वांचा सत्कार करून त्यांना आहेर करण्याचे ठरले आहे. हे लोकमंगल समूहाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. त्यामुळे या विवाह समारंभाच्या मंडपाला जोडून उभ्या करण्यात आलेल्या दालनात लोकमंगल समुहाच्या आजवरच्या कार्याचे दर्शन घडविणारे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. शिवाय दरवर्षी प्रमाणे रक्तदान शिबीरही आयोजित करण्यात आले आहे.
दरवर्षी प्रमाणे कन्यादान मा. आ. सुभाषबापू देशमुख आणि त्यांच्या सुविद्य पत्नी मा. सौ. स्मिताताई देशमुख यांच्या हस्ते होईलच, पण यंदाच्या समारंभातील काही वधूंचे कन्यादान लोकमंगलच्या देणगीदारांच्या हस्ते केले जाईल. समारंभासाठी शिवाजी अध्यापक विद्यालयाच्या मैदानावर २५० x २00 फूट आकाराचा मुख्य अक्षता मंडप उभारण्यात येणार असून जेवणाची व्यवस्था ९०x१५० फूट आकाराच्या मंडपात करण्यात येणार आहे. याचसोवत यावेळी सादर होणा-या विविध गुणदर्शनाच्या कार्यक्रमासाठी २० x ३० फूट ची दोन व्यासपीठे उभारली जातील मुख्य व्यासपीठा १५×५० फूट आकाराचे असेल. अक्षता सोहळयाला अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. लोकमंगल फाऊंडेशनचे पदाधिकारी, अधिकारी आणि सामुदायिक विवाह सोहळा संयोजन समितीचे पदाधिकारी तसेच कार्यकर्ते विवाह सोहळयाच्या यशस्वितेसाठी प्रयत्नशील आहेत.