सांगली : विधानसभा निवडणुकीत आम्ही काँग्रेस, शिवसेना (ठाकरे गट) आणि डाव्या कम्युनिस्ट पक्षांना एकत्र घेऊन निवडणूक लढत आहोत. महाराष्ट्राच्या राजकारणात वाट्टेल ते झालं तरी चालेल पण देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या घटकांच्या हातात महाराष्ट्राची सत्ता जाऊ द्यायची नाही. त्यादृष्टीने ही विधानसभा निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे, असे वक्तव्य शरद पवार यांनी केले. ते शुक्रवारी आर. आर. आबांचे सुपुत्र रोहित पाटील यांच्या प्रचारासाठी तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघात आयोजित करण्यात आलेल्या प्रचारसभेत बोलत होते.
यावेळी शरद पवार यांनी पंतप्रधान मोदी आणि भाजपच्या संविधानाविषयीच्या हेतूविषयी शंका उपस्थित केली. आम्ही एकेकाळी नरसिंह राव यांच्या नेतृत्त्वाखाली 250 पेक्षा कमी जागा असताना केंद्रात सरकार चालवले होते. पण मोदी साहेब सांगतात की, आम्हाला 400 जागा द्या. त्यामुळे आमच्या मनात शंका आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेली घटना बदलायची असले तर संसदेत खासदारांची मोठी संख्या असणे आवश्यक असते. आजच्या राज्यकर्त्यांच्या मनात वेगळा विचार आहे, त्यासाठी ते सातत्याने 400 जागांची मागणी करत असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
रोहित चिंता करु नको, तुला कोणीही एकटं पाडू शकत नाही: शरद पवार
रोहित पाटील यांनी आपल्या भाषणात म्हटले की, मला एकटे पाडण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण तुम्ही चिंता करु नका, तुम्हाला कोणीही एकटे पाडू शकणार नाही. तासगाव आणि कवठेमहांकाळ या दोन तालुक्यातील तरुणांची शक्ती जोपर्यंत तुमच्या पाठीशी आहे, तोपर्यंत रोहित पाटील यांना चिंता करण्याचे कारण नाही. याशिवाय, त्यांच्यामागे आर.आर. आबांची पुण्याई आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यात आर.आर. आबा हे नाव माहिती आहे.