हद्दवाढ भागातील नागरिकांचा निर्धार मेळावा संपन्न
सोलापूर दि. १२:- महाराष्ट्रातील विकसनशील शहरातल्या क्रमवारीत सोलापूर शहराचा देखील समावेश असून केंद्र सरकारने सोलापूर शहराला स्मार्ट बनविण्यासाठी स्मार्टसिटी योजनेत समावेश केले. नागरीकरण आणि शहरीकरणामुळे मोठ्या प्रमाणात शहर हद्दवाढ भागाचा विस्तार झाला. शहरातील असंख्य गरीब कष्टकरी कुटुंब भाडे परवडत नसल्यामुळे पै-पैसे जमवून हद्दवाढ भागात ५०० ते १००० चौ.मी. ची खुली जागा विकत घेऊन त्या ठिकाणी पत्रे किंवा कच्चे बांधकाम करून राहू लागले. त्यांना सोलापूर महानगरपालिकेकडून मुलभूत सुविधा अर्थातच रस्ते, ड्रेनेज, पथदिवे त्याचबरोबर पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. वास्तविक त्या ठिकाणी ड्रेनेजची व्यवस्था नसतानासुद्धा सक्तीने युजर्स चार्जेस वसूल केला जातो. रात्री-अपरात्री कमी दाबाने पाणी पुरवठा केला जातो. त्यामुळे दिवसभर काम करून थकलेल्या श्रमिकांना आपली झोपमोड करून पाणी भरावे लागते. हि दुर्दैवीवेळ कोणामुळे आली? हद्दवाढ भाग हा शहराला मोठ्या प्रमाणात महसूल देणारा भाग असून त्यांना मिळणाऱ्या मुलभूत सोयी-सुविधांपासून वंचित ठेवल्यामुळे हद्दवाढ भागाचा विकास खुंटलेला आहे. याला इथली राजकीय इच्छाशक्ती कारणीभूत असल्याचा घणाघाती आरोप ज्येष्ठ नेते माजी आमदार कॉ. नरसय्या आडम (मास्तर) यांनी केला.
बुधवार दि. ११ सप्टेंबर २०२४ रोजी सुनील नगर येथे रमेश चक्राल यांच्या अध्यक्षतेखाली हद्दवाढ भागातील नागरिकांचा निर्धार मेळावा पार पडला.
यावेळी नागरिकांनी या मेळाव्यात हद्दवाढ भागातील समस्यांचा पाढा वाचले.
शहरातील लोकांना स्वच्छ व मुबलक पाणी, अंतर्गत रस्ते, ड्रेनेज लाईन, बाग-बगीचा, पथदिवे, अभ्यासिका, समाज मंदिरे, व्यायाम शाळा, आरोग्य केंद्र आदि सुविधा मिळतात. परंतु शहराचाच एक महत्वाचा भाग असणाऱ्या हद्दवाढ भागात लोकप्रतिनिधी अथवा महानगरपालिकेचे कर्मचारी-अधिकारी फिरकत नाहीत. वारंवार तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. त्यामुळे अनेकवेळा दुर्गंधी व अस्वच्छतेमुळे हिवताप, कॉलरा, गस्ट्रो, हगवण, खोकला, डोकेदुखी अशा आरोग्याच्या समस्या उद्भवतात. परंतु परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी नेमलेले सफाई कामगार दिसत नाहीत. यामुळे नरकयातना भोगण्याची पाळी आमच्यावर आली आहे. या सर्व यातना मधून मुक्त होण्यासाठी आगामी विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्राचा बुलंद आवाज श्रमिकांचा मसिहा आडम मास्तर यांना आमदार करण्याचा निर्धार केलेला आहे. त्यासाठी हद्दवाढ भागातील सर्व नागरीक एकजुटीने निरपेक्ष भावनेने काम करण्याची ग्वाही या मेळाव्यात दिले.
प्रास्ताविक कॉ. बापू साबळे यांनी केले तर सूत्रसंचालन व आभार कॉ. बाळकृष्ण मल्याळ यांनी केले.
व्यासपीठावर हुतात्मा रेडिमेड व शिलाई कामगार गृहनिर्माण संस्थेचे सचिव वीरेंद्र पद्मा, यादगिरी नराल, अनिल लिंबोळे, प्रभाकर मुणक्याल, सावित्रा गुंडला आदींची उपस्थिती होती.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मल्लिकार्जुन बेलियार, अंबादास गडगी, प्रवीण आडम, सिद्राम गडगी, प्रशांत विटे, सनी कोंडा, अरुण सामल, प्रकाश कुऱ्हाडकर, आंबदास बिंगी, मोहन कोक्कुल, बालाजी तुम्मा, बालाजी गुंडे, गोपाळ जगलेर, श्रीनिवास तंगडगी, अनिल घोडके, नागनाथ जल्ला परिश्रम घेतले.