सोलापूर (प्रतिनिधी) : आगामी काळात येणार्या कार्तिकी यात्रेस शासनाचे सर्व नियम पाळत परवानगी द्यावी यासह विविद्य मागण्यांसाठी कार्तिकी यात्रा समन्वय समितीच्या पदाधिकार्यांसह आ. सुभाष देशमुख यांनी जिल्हाधिकार्यांना निवेदन दिले. यावेळी यात्रा निर्बंधाऐवजी निर्विघ्नपणे पार पडावी, याबाबत चर्चा करण्यात आली.
कार्तिकी यात्रेला यंदा परवानगी मिळावी या मागणीसाठी यात्रा समन्वय समितीच्या पदाधिकारी सुधाकर महाराज इंगळे, राणा वासकर महाराज, रामकृष्ण वीर महाराज, निवृत्ती रामदास महाराज यांनी आ. देशमुख यांची भेट घेतली. यावेळी आ. देशमुख यांनी पदाधिकार्यांसमवेत जिल्हाधिकारी मिलींद शंभरकर यांना निवेदन दिले.
पंढरपुरातील प्रत्येक मठात 50 वारकर्यांनाच प्रवेश द्यावा, प्रत्येक दिंडीत 10 वारकर्यांनाच परवानगी द्यावी, 65 एकर जमिनीवर तंबू, राहुट्या बांधण्यास प्रतिबंध करावा, सामाजिक अंतर राखेत चंद्रभागेत स्नानाची सोय करावी, एकदशी दिवशी नगर प्रदक्षिणा 6 ते 12 यावेळेतच करावी, दुसर्या दिवशी महाद्वारकाला छोट्या प्रमाणात साजरा करावा, कोरोनायोद्धांची नेमणूक करत त्यांच्याद्वारे प्रबोधन करावे यासह विविध विषयांवर आ. सुभाष देशमुख आणि पदाधिकार्यांनी जिल्हाधिकार्यांशी चर्चा केली.