येस न्युज नेटवर्क : कर्नाटकात काँग्रेसनं मुसंडी मारत भाजपला मोठा धक्का दिला आहे. कर्नाटकची निवडणुकीकडे 2024 लोकसभा निवडणुकांची सेमीफायनल म्हणून पाहिलं जात होतं. अशातच काँग्रेसच्या एकहाती विजयामुळे 2024 मध्येही भाजपला शह देण्यात विरोधकांची एकजूट यशस्वी होणार असल्याचं बोललं जात आहे.
कर्नाटकच्या विजयाचा 2024 ला काय परिणाम होणार? विधानसभा तर गेली, पण लोकसभेतही भाजपला फटका बसणार का…? आकडे काय सांगतात, इतिहास काय सांगतो…? कर्नाटकमध्ये काँग्रेसला विजय मिळाल्यानंतर सध्या या प्रश्नांची चर्चा सुरु आहे. कुठलाही विजय हा दिलासादायकच असतो. या विजयानं काँग्रेसला लोकसभेसाठी रसद पुरवणारं राज्य दिलंय, सोबत कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिलाय आणि मित्रपक्षांमध्ये प्रतिष्ठाही वाढवली आहे. पण जी किमया विधानसभेत घडली ती लोकसभेतही आपोआप दिसेल या भरवश्यावर मात्र काँग्रेसला राहून चालणार नाही.
2019 च्या लोकसभा निवडणुकीआधीही मध्य प्रदेश, राजस्थान छत्तीसगढ ही तीन राज्यं काँग्रेसनं जिंकली होती. त्यावेळी भाजपसाठी हा मोठा धक्का मानला जात होता. पण त्यानंतर अवघ्या काही महिन्यांत झालेल्या लोकसभा निवडणुकीत मात्र या तीन राज्यांतल्या 65 पैकी 62 लोकसभा जागा भाजपनं जिंकल्या होत्या. म्हणजे राज्यं काँग्रेसकडे पण लोकसभा मोदींकडे असा कौल अवघ्या काही महिनाभरात जनतेनं दिला होता.