मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना अंमलबजावणी संचालनालयाकडून नोटीस बजवण्यात आली. मात्र, चौकशीसाठी मुदत वाढवून द्यावी, अशी विनंती जयंत पाटील यांनी ईडीला पत्र देऊन केल्याची माहिती देण्यात आली आहे. आयएल & एफएस या कंपनीत झालेल्या कथित आर्थिक घोटाळाप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना ईडीने नोटीस जारी केली असून, त्यांना १२ मे रोजी ईडीच्या कार्यालयात हजर राहण्यास सांगितले आहे. मात्र, चौकशीसाठी हजर राहण्यास मुदत वाढवून द्यावी, अशी विनंती जयंत पाटील यांनी केली आहे.
चौकशीसाठी मुदत वाढवून द्यावी
आयएल ॲण्ड एफएस या संस्थेशी माझा कोणताही संबध नाही. त्यांच्याकडे कधी कर्ज मागण्यासाठी गेलेलो नाही. आता नोटीस प्राप्त झाली आहे तर चौकशीला सामोरा जाईन. पण सध्या जवळच्या लोकांची लग्न आहेत. त्यामुळे दोन-तीन दिवसांनी चौकशीसाठी येईन, असे पत्र ईडीला पाठविले आहे. ईडी नोटीस का पाठवते हे देशाला माहिती आहे. त्यामुळे आत्ताच नोटीस का आली, याचे मला आश्चर्य वाटत नाही. मला का लक्ष्य करण्यात आले हे समजत नाही, असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे.