सोलापूर : महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने आयोजित १६ वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेत सोलापूर चा सलामीवीर जयराज कुमणे याने ११ सामन्यात आठ अर्धशतकासह स्पर्धेतील सर्वाधिक ६८९ धावा केल्या. त्या कामगिरीवर त्याची महाराष्ट्र क्रिकेट संघात निवड झाली. तर १६ वर्षाखालील क्रिकेटपटू अर्थव अशोक काळे यांची महाराष्ट्र क्रिकेट संघात कर्णधारपदी निवड झाली आहे.
जयराज कुमणे याने सोलापूर व महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या सेक्रेटरी इलेव्हनचे कर्णधार पदही भूषविले असून स्पर्धेतील उपविजेतेपद पटकावले. तो माॅडेल क्रिकेट अकॅडमीचा खेळाडू असून एस .आर चंडक हायस्कूलचा विद्यार्थी आहे. तर महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्यावतीने आयोजित १६ वर्षाखालील क्रिकेट स्पर्धेत अथर्व काळे याने दोन अर्ध शतके, सेमी फायनलमध्ये नाबाद ९७ धावा व अंतिम सामन्यात १०० धावा असे एकूण ६ सामन्यात ४०० धावा करून स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले आहे. अथर्वला रणजीपटू रोहित जाधव, सत्यजीत जाधव, अक्षय हावळे, प्रकाश कंपल्ली, मास्टर्स क्रिकेट अकॅडमीचे राजेश येमुल, नदाफ क्रिकेट अकॅडमी चे साई नदाफ, शाहनुर नदाफ यांचे मार्गदर्शन लाभले. या निवड झालेल्या दोघांना आ. रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.