सोलापूर : जल जीवन मिशन अंतर्गत घरोघरी नळ जोडणी , ५० ग्रामपंचायतीमधील घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनाचे उद्दिष्ट येत्या मार्च अखेर पूर्ण करण्याच्या सुचना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी दिल्या आहेत.
जिल्हा परिषदेच्या शिवरत्न सभागृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या जल जीवन मिशन अंतर्गत घर , शाळा , अंगणवाडी , घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन बाबतच्या बैठकीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी स्वामी हे बोलत होते.यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) गोरख शेलार ,शिक्षणाधिकारी संजय राठोड, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एस.कटकधोंड , शाखा अभियंता पी.एस.हरिसंगम यांच्यासह सर्व उपअभियंता, शाखा अभियंता व कर्मचारी आदी उपस्थित होते.
या बैठकीमध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी म्हणाले , जल जीवन मिशन अंतर्गत १०० दिवसांमध्ये जिल्ह्यातील शाळा व अंगणवाडीमध्ये नळ जोडणीचे उद्दिष्ट पूर्ण करायचे होते पण सदरचे उर्वरित काम हे कसल्याही परिस्थितीत येत्या जानेवारी अखेर शंभर टक्के पूर्ण करावयाचे आहे.सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत जिल्ह्यातील ५० ग्रामपंचायतीचे अंदाजपत्रक तयार करुन तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देऊन प्रत्यक्ष काम त्वरित सुरू करण्याचे आवाहनही करण्यात आले.जिल्ह्यात घरोघरी नळ जोडणीचे १ लाख ८१ हजार इतके उद्दिष्ट आहे.त्यामधील ८० हजार इतके शिल्लक उद्दिष्ट येत्या मार्च अखेर पूर्ण करणे आवश्यक आहे.तसेच १८४ इतक्या प्रगती पथावरील प्रस्तावित नळ पाणी पुरवठा योजना पूर्ण करणे , उपविभागस्तरावरील नळ जोडणी करण्याचे २०० इतके उद्दिष्ट आणि ४७७ इतक्या सुधारणात्मक कामांचेही अंदाजपत्रके येत्या मार्च अखेर पूर्ण करण्याच्या सुचना देण्यात आल्या.