करिअर मार्गदर्शन केंद्र व वाणिज्य-व्यवस्थापन संकुल इमारतींचे भूमिपूजन संपन्न
सोलापूर – उच्च शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासासाठी पोषक वातावरण निर्माण करण्याच्या दृष्टीने पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ येथे अत्याधुनिक पायाभूत सुविधा उभारण्याचा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. करिअर मार्गदर्शन केंद्र, वाणिज्य व व्यवस्थापन संकुलाची नवी इमारत, खेळाडूंसाठी सुसज्ज मल्टीपर्पज क्रीडा हॉल, तसेच व्यापक वृक्षारोपण यांसारख्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी अनुकूल, हरित आणि प्रेरणादायी वातावरण उपलब्ध होईल, असा विश्वास सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी व्यक्त केला.



मंगळवारी, विद्यापीठ परिसरात पीएम-उषा योजनेअंतर्गत मंजूर निधीतून उभारण्यात येणाऱ्या अत्याधुनिक करिअर मार्गदर्शन केंद्राचे भूमिपूजन पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते, तर वाणिज्य व व्यवस्थापन संकुलाच्या नव्या इमारतीचे भूमिपूजन जागतिक उद्योगपती यतीन शहा यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर होते. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. लक्ष्मीकांत दामा, व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजाभाऊ सरवदे, प्रा. देवानंद चिलवंत, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, अधिसभा सदस्य ॲड. मल्लिनाथ शहाबादे, डॉ. वीरभद्र दंडे, माधव देशपांडे, अजित संगवे, डॉ. जैनुद्दीन मुल्ला, वित्त व लेखा अधिकारी डॉ. महादेव खराडे, परीक्षा विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, अभियंता गिरीश कुलकर्णी, प्रल्हाद कांबळे, डॉ. हनुमंत अवताडे आदींची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत पीएम-उषा विभागाचे संचालक डॉ. प्रभाकर कोळेकर यांनी केले
यावेळी बोलताना पोलीस अधीक्षक कुलकर्णी म्हणाले की, विद्यापीठाच्या सर्वांगीण विकासासाठी कुलगुरू डॉ. महानवर व त्यांची संपूर्ण टीम सातत्याने प्रयत्नशील असल्याचे स्पष्टपणे दिसून येते. आधुनिक शैक्षणिक इमारती, स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन सुविधा, कौशल्यविकासासाठी प्रशिक्षण केंद्रे आणि क्रीडा सुविधा यामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकासाला चालना मिळेल. आज निर्माण होणाऱ्या या भक्कम पायाभूत सुविधांचा दीर्घकालीन लाभ हजारो विद्यार्थ्यांना होणार असून त्यांच्या करिअर घडविण्यात याचा मोठा वाटा असेल, असे त्यांनी नमूद केले.
पीएम-उषा विभागाचे उपसंचालक दत्तात्रय लोंढे यांनी सांगितले की, या योजनेअंतर्गत राज्यातील केवळ चार विद्यापीठांना प्रत्येकी शंभर कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्यामध्ये सोलापूर विद्यापीठाचा समावेश आहे. या निधीतून शैक्षणिक, संशोधनात्मक आणि प्रशासकीय पायाभूत सुविधांचा व्यापक विकास करण्यात येत आहे. गुणवत्तापूर्ण आणि दर्जेदार कामे वेळेत पूर्ण व्हावीत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
कुलगुरू डॉ. प्रकाश महानवर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले की, विद्यापीठाच्या प्रगतीसाठी शासन, उद्योगक्षेत्र, प्रशासन आणि समाजातील सर्व घटकांचे सहकार्य लाभत आहे. नव्याने उभारण्यात येणाऱ्या सुविधा विद्यार्थ्यांना जागतिक स्पर्धेत सक्षम बनविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहेत. करिअर मार्गदर्शन केंद्रामुळे स्पर्धा परीक्षा व विविध क्षेत्रातील रोजगाराच्या संधींबाबत विद्यार्थ्यांना योग्य दिशा मिळेल, तर वाणिज्य व व्यवस्थापन संकुलाची नवी इमारत आधुनिक अध्यापन पद्धतींसाठी सक्षम व्यासपीठ ठरेल. शेवटी आभार प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांनी मानले.

