येस न्युज नेटवर्क : टी20 विश्वचषक स्पर्धेत भारतही सेमीफायनलमध्ये पोहोचला असून सर्वाधिक गुण घेत भारतानं सेमीफायनल गाठली आहे. नुकत्याच झालेल्या झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात भारताने 71 धावांनी विजय मिळवला आहे. भारत विरुद्ध झिम्बाब्वे सामना ऑस्ट्रेलियातील मेलबर्न क्रिकेट ग्राऊंडवर खेळवला गेला. ज्यात भारतानं केएल राहुल आणि सूर्यकुमारच्याअर्धशतकांच्या जोरावर 186 धावा स्कोरबोर्डवर लावल्या. ज्यानंतर अप्रतिम गोलंदाजी करत अवघ्या 115 धावांत झिम्बाब्वेला सर्वबाद करत भारतानं 71 धावांनी विजय मिळवला आहे. या विजयासह भारताचे गुणतालिकेत 8 गुण झाले असून दोन्ही ग्रुपमधील संघामध्ये भारताचेच गुण सर्वाधिक आहेत. भारतानं केवळ एक साखळी सामना (दक्षिण आफ्रिकेविरुद्ध) गमावला असून इतर सर्व सामने जिंकले आहेत.
सामन्यात सर्वप्रथम नाणेफेक जिंकत भारतानं फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुणतालिकेत कमाल कामगिरीमुळे भारत आधीच सेमीफायनलमध्ये पोहोचला होता, त्यामुळे आजचा सामना औपचारिकता होती. तरीही एक मोठा विजय मिळवून सेमीफायनलमध्ये एन्ट्री करायची यासाठी कर्णधार रोहितनं पहिली फलंदाजी घेतली. ज्यानंतर रोहित आणि राहुल मैदानात आले, पण रोहित 15 धावा करुनच तंबूत परतला. कोहलीही 26 धावा करुन बाद झाला. पण राहुलने आज संयमी फलंदाजी करत 51 धावा केल्या. त्यानंतर सूर्यकुमारनं क्रिजवर आल्यापासून फटकेबाजी कायम ठेवली. त्याला पांड्याने 18 धावांची मदत करत एक चांगली भागिदारी उभारली. सामन्यात अवघ्या 25 बॉलमध्ये नाबाद 61 धावा करत सूर्यकुमारने भारताची धावसंख्या 186 पर्यंत पोहोचवली.