सोलापूर, दि. 29- 40 वर्षांपूर्वी भारताला इतर देशांकडून शस्त्रास्त्रे आयात करावे लागत असे, आज भारत स्वदेशी शस्त्रास्त्र, उपग्रह, अत्याधुनिक क्षेपणास्त्रानी स्वयंपूर्ण असून जगासमोर भारताची ताकद सिद्ध झाली आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ, डीआरडीओचे निवृत्त संचालक डॉ. काशिनाथ देवधर यांनी केले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ आणि ह्युमन यूप्लीटमेंट अँड डेव्हलपमेंट असोसिएशन मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने हुडा असोसिएशन व्याख्यानमाला 2023-24 अंतर्गत आयोजित व्याख्यानाचे सहावे पुष्प डॉ. देवधर यांनी गुंफले. ‘राष्ट्राची एकात्मता व सुरक्षिततेसाठी संरक्षण तंत्रज्ञानातील आत्मनिर्भर भारताचे योगदान’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा हे होते. यावेळी व्यासपीठावर कुलसचिव योगिनी घारे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक सहायक कुलसचिव डॉ. शिवाजी शिंदे यांनी केले. कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला.
डॉ. देवधर म्हणाले की, आज भारताकडील नौसेना, वायुसेना, लष्करी दल या सर्व सेना देशाच्या सुरक्षेसाठी सक्षम असून भारतातील वैज्ञानिकांनी अत्याधुनिक शस्त्रास्त्रे, क्षेपणास्त्रे, उपग्रह बनवून भारत देशाची जगासमोर एक वेगळी ताकद सिद्ध केली आहे. पृथ्वी, आकाश, त्रिशूल, नाग, अग्नी, ब्रह्मास्त्र ही क्षेपणास्त्रे तसेच तेजस लढाऊ विमानाची निर्मिती ही भारताला आत्मनिर्भर बनवत आहे. मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा यासाठी फार मोठे योगदान देशाला लाभले आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली हा भारत देश जागतिक महासत्ता बनण्याच्यादृष्टीने संरक्षण क्षेत्रात वाटचाल करीत आहे. गेल्या दहा वर्षातील कामगिरी अतिशय महत्त्वपूर्ण असल्याचेही डॉ. यावेळी म्हणाले.
प्र-कुलगुरू डॉ. दामा म्हणाले की, देशातील शास्त्रज्ञ आणि सर्व दलातील सैनिकांमुळे आज भारत देश सुरक्षित असून अत्याधुनिक क्षेपणास्त्रांमुळे भारत देश प्रगती करीत आहे. ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. काशिनाथ देवधर यांनी आज याविषयी विद्यापीठात चांगली माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. श्रुती देवळे यांनी केले.