अहिल्यादेवींचा लढवय्या करारी बाणा…जीवनकार्याचे चित्रांतून दर्शन..
सोलापूर, दि. 28- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त चित्र व ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. चित्र प्रदर्शनामध्ये एकापेक्षा एक सुंदर अशी सुबक व सुंदर चित्रे ठेवण्यात आली आहेत. यामधून पुण्यश्लोक अहिल्यादेवी यांचा लढवय्या करारी बाणा, त्यांचे जीवनकार्य, त्यांनी निर्माण केलेले घाट, बारवे, मंदिरांचा जीर्णोद्धार याचे दर्शन होऊन अहिल्यादेवींचा जाज्वल्य इतिहास डोळ्यासमोर तरळतो.


पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील डॉ. कर्मवीर मामासाहेब जगदाळे ज्ञानस्रोत केंद्रामध्ये आयोजित चित्र व ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या व अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते करून करण्यात आले. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे, परिवर्तन सामाजिक संस्थेच्या अमृता अकलूजकर, ज्ञानस्रोत केंद्राचे प्रभारी संचालक डॉ. अनिल घनवट, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. केदारनाथ काळवणे, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. राजेंद्र वडजे, परीक्षा विभागाचे संचालक डॉ. श्रीकांत अंधारे, वित्त व लेखाधिकारी सीए महादेव खराडे, डॉ. पल्लवी सावंत आदींची प्रमुख उपस्थिती होती.
विद्यापीठातील ललितकला व कला विभागातील विद्यार्थी, शिक्षक व चित्रकारांनी रेखाटलेली चित्रे प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. एकूण 21 चित्रांचा यामध्ये समावेश आहे. याचबरोबर अहिल्यादेवींच्या जीवनकार्यावरील ग्रंथ, पुस्तके ग्रंथ प्रदर्शनात ठेवण्यात आली आहेत. यावेळी विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आरोग्य शिबिरात 250 जणांची तपासणी.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त विद्यापीठातील आरोग्य संकुल कडून आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा एकूण 250 जणांनी लाभ घेतला. यामध्ये विद्यापीठातील शिक्षक, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व नागरिकांचे मधुमेह व कोलेस्ट्रॉल तपासण्यात आले. वैद्यकीय अधिकारी डॉ.अभिजीत जगताप यांच्या पथकाकडून ही तपासणी करण्यात आली.
आज विद्यापीठात योगेश चिकटगावकर यांचा ‘लोककलेची ललकार’ कार्यक्रम रंगणार.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त विद्यापीठाकडून उद्या (गुरुवारी) दुपारी तीन वाजता विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात मुंबईचे सुप्रसिद्ध लोककलावंत शिवपाईक योगेश चिकटगावकर यांचा ‘लोककलेची ललकार’ हा कार्यक्रम पार पडणार आहे. जुना काळातील पिंगळा यासह लोकगीते व संगीतांचा कार्यक्रम यावेळी सादर होणार आहे. तसेच शुक्रवार, दि. 30 मे रोजी सकाळी 10 वाजता विद्यापीठातील कर्मचाऱ्यांकडून शहरातील नार्थकोट प्रशाले ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुतळा परिसर येथे शोभायात्रा काढण्यात येणार आहे. दि. 31 मे रोजी जयंती सोहळ्याचा मुख्य कार्यक्रम विद्यापीठात पार पडणार आहे