- सोलापूर : सुरत-चेन्नई ग्रीनफिल्ड हायवे संघर्ष समितीने वेळोवेळी केलेल्या आंदोलनामुळे जमिनीच्या मोबदल्याचा विषय चांगलाच पेटला आहे. केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतल्यानंतर सोलापुरात मागील तीन दिवसांपासून अक्कलकोट आणि दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी विविध राजकीय नेत्यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन निवेदन दिली तसेच मोबदला वाढवून देण्याची मागणी केली आहे.
- गुरुवारी भूसंपादन कार्यालयाच्या बाहेर सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड संघर्ष समितीच्या वतीने अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांच्या नेतृत्वाखाली शेकडो शेतकऱ्यांनी घोषणाबाजी करत लक्ष वेधले. यावेळी बार्शी तालुक्यातील शेतकऱ्यांनीही या आंदोलनात आता सहभाग घेतला आहे.
बाळासाहेब मोरे म्हणाले, शासन समृद्धी महामार्गाला वेगळा दर आणि तोही जास्त दर असे का? सुरत चेन्नई ग्रीनफिल्ड महामार्गाला समृद्धी महामार्ग प्रमाणे दर मिळावा, चालू बाजारभावाच्या पाचपट रक्कम शेतकऱ्याला मिळावी, शेतकऱ्यांना मिळणारी दिलासा रक्कम त्यामध्ये चार पटीने वाढ करावी अशा मागण्या सांगताना या तीन मागण्या मान्य केल्या तरच हा ग्रीनफिल्ड हायवे सोलापूर जिल्ह्यातून जाऊ देणार अन्यथा हा हायवे होऊ देणार नाही असा इशारा दिला.