सातारा ( सुधीर गोखले) – पश्चिम महाराष्ट्रासाठी वरदान ठरलेल्या कोयना धरणामध्ये यंदा गतवर्षी पेक्षा चांगला पाणीसाठा झाला आहे आज अखेर ६७ टी एम सी इतका पाणीसाठा झाला आहे कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये असलेले नवजा गावातील पर्जन्यमानाने आजपर्यंत तब्ब्ल ३५०० मि मी चा टप्पा पार केला आहे सध्या कोयना पायथा विद्युत गृहातून २१०० क्युसेक्स इतका पाण्याचा विसर्ग वीजनिर्मिती करून नदीपात्रात होत आहे. गेल्या चोवीस तासामध्ये नवजा ला १३० तर महाबळेश्वर येथे ९५ मि मी पाऊस झाला आहे.
जिल्ह्यातील कास, बामणोली, तापोळा, नवजा महाबळेश्वर अशा प्रमुख ठिकाणी पावसाचा जोर गेल्या महिन्याभरापासून आहे सध्या पश्चिम भागात पावसाचा जोर कमी असला तरी पाणलोट क्षेत्रामध्ये डोंगररांगांमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. जिल्ह्यातील बरीच छोटी मोठी धरणे ६० टक्क्यांवर भरली आहेत. आज सायंकाळ पर्यंत कोयनानगर येथे ९४ मि मी पाऊस पडला तर नवजाला १३० मि मी पावसाची नोंद झाली . एक जून पासून कोयना येथे २५५३ मि मी पावसाची नोंद झाली तर नवजा ला सर्वाधिक म्हणजे ३५९० इतकी आणि महाबळेश्वर ला ३३५३ मि मी पावसाची नोंद झाली. कोयना धरणातील पाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर सुरूच आहे सुमारे ३१ हजार क्युसेक्स इतकी पाण्याची आवक सध्या धरणामध्ये होत आहे यावर्षी जरी पावसाचे उशिरा आगमन झालेले असले तरी पावसाने चांगली बॅटिंग केल्याचे चित्र आहे.