सोलापूर जिल्ह्यासाठी खरीप 2023 मध्ये ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि. या विमा कंपनीची नियुक्ती
सोलापूर दि. 26 (जि.मा.का.):- जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे अथवा काढणी पश्चात नुकसान झाल्यास शेतकऱ्यांनी घटना घडल्यापासून 72 तासाच्या आत नुकसानी बाबतची सुचना नोंद करण्यासाठी पिक विमा ॲप अथवा टोल फ्री क्रमांक 1800118485 या क्रमांकाचा वापर करावा. तसेच टोल फ्री क्रमांक उपलब्ध न झाल्यास सदर आपत्तीची माहिती विमा कंपनीचे प्रतिनिधी, बँक, अथवा कृषि व महसूल विभाग यांना द्यावी असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी दत्तात्रय गावसाने यांनी केले आहे.
प्रधानमंत्री पिक विमा योजना खरीप 2023 या हंगामाकरीता अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी जिल्ह्यामध्ये राबविण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यासाठी खरीप 2023 मध्ये ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लि. या विमा कंपनीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पिक विमा योजने अंतर्गत खरीप 2023 मध्ये जिल्ह्यातील 6 लाख 76 हजार 311 शेतकऱ्यांनी 5 लाख 23 हजार 177 हेक्टर क्षेत्रासाठी पिक विमा उतरविलेला आहे, अशी माहिती श्री. गावसाने यांनी दिली.
सद्यस्थितीत मागील 4 ते 5 दिवसापासून जिल्ह्यातील बहुतांश भागामध्ये पाऊस सुरु असून काही भागामध्ये जास्त पावसामुळे पिकांचे नुकसान झालेले असू शकते या पार्श्वभूमीवर पिक पेरणीपासून ते काढणी पर्यंत पावसाच्या पाण्यामुळे विमा संरक्षित क्षेत्र जलमय झाल्यास, भूस्खलन, गारपीट, ढगफुटी अथवा वीज कोसळल्यामुळे लागणारी नैसर्गिक आग या स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसानग्रस्त झाल्यास होणारे अधिसूचित पिकांचे नुकसान हे वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन निश्चित करण्यात येते, असे त्यांनी सांगितले.
तसेच सद्यस्थितीत काही पिकांची काढणी सुरु असून अधिसूचित क्षेत्रातील शेतात पिक कापणी करुन सुकवणीसाठी पसरवून ठेवलेल्या अधिसूचित पिकांसाठीच कापणीपासून जास्तीत जास्त दोन आठवड्यापर्यंत (14 दिवस) गारपीट, चक्रीवादळ, चक्रीवादळामुळे पडलेला पाऊस व अवकाळी पावसापासून नुकसान झाल्यास वैयक्तिक स्तरावर पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्यात येते, असेही श्री. गावसाने यांनी कळविले आहे.