मुंबईतील आझाद मैदानात लिंगायत समाजाच्या वतीने विविध मागण्यासाठी महामोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्य सरकारकडून त्यांच्या सुमारे ७०-८० टक्के मागण्या मान्य करण्यात आली आहे. त्यामुळे मार्चा माघार घेत असल्याची घोषणा अविनाश भोसीकर आणि विनय कोरे यांनी केली.
लिंगायत समाजाला धार्मिक अल्पसंख्यांक दर्जा मिळावा यासह समाजाच्या विविध मागण्यासाठी काढलेल्या मार्चात समाजाचे मोठ्या प्रमाणात नागरिक सहभागी झाले होते. मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, असा इशाराच यावेळी आंदोलकांनी दिला होता. दरम्यान सरकारकडून महत्त्वाच्या मागण्या मान्य झाल्याने मोर्चा स्थगित करण्यात आला आहे. याबाबत अविनाश भोसीकर म्हणाले, २२ जानेवारी रोजी समाजाच्या मागण्यांवर चर्चा झाली होती. राज्य सरकारने आपल्या अधीनस्थ मागण्या मान्य केल्या आहेत. तरकाही केंद्र पातळीवरील विषय आहेत, त्यासाठी यापुढेही लढा सुरूच राहील.
विनय कोरे म्हणाले, राज्य सरकारकडून सुमारे ८० टक्के मागण्या मान्य करण्यात आल्या आहेत. त्यात बसवेश्वर यांच्या नावाचं विद्यापीठ तयार करणे, बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळ स्थापन करणे, आदी मागण्यांचा समावेश आहे. याबाबत येणाऱ्या अधिवेशनापूर्वी घोषणा करण्याची आग्रही मागणी केली ती मान्य होईल.विधिमंडळात बसवेश्वरांचा पुतळा बसवण्याची मागणी केली होती, ती राज्यसरकारने मान्य केली. त्यासाठी जागा शोधणं सुरू आहे. उपलब्ध झाली नाही तर तिथे तैलचित्र लावण्याचं मान्य करण्यात आल्याची माहितीही कोरे यांनी दिली आहे. भारतीय लिंगायत समन्वय समितीचे विजय हतुरे यांनी जवळपास ८० टक्के मागण्या मान्य केल्याबद्दल राज्य सरकारचे आभार मानले.