मुंबई: महाराष्ट्रातील काँग्रेसचे पुढारी आपण सामना वाचत नसल्याचा टेंभा मिरवतात. हा त्यांचा प्रश्न आहे. पण सोनिया गांधीही ‘सामना’ची दखल घेतात, अशा शब्दांत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नाना पटोले यांना प्रत्युत्तर दिले आहे. पश्चिम बंगालच्या निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवानंतर ‘सामना’त अग्रलेख छापून आला होता. त्यामध्ये काँग्रेसच्या नेतृत्त्वाविषयी शंका उपस्थित करण्यात आल्या होत्या. यावरुन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी संजय राऊत यांना फटकारले होते. आम्ही संजय राऊत यांच्या बोलण्याकडे लक्षही देत नाही आणि ‘सामना’ही वाचत नाही, असे त्यांनी म्हटले होते.
‘पवारांसारखी माणसं आज काँग्रेसमध्ये नसतील तर त्यास जबाबदार कोण?’
काँग्रेस पक्ष हा स्वातंत्र्य लढ्यातून लोकांत व देशात रुजला. स्वातंत्र्य लढ्यातील संघर्षानं अनेक सामान्य कार्यकर्तेही मोठे झाले, पण त्या छोट्यांचे नेतृत्व करणारी मंडळी थोर होती. दादाभाई नौरोजी, लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, जयप्रकाश नारायण, आचार्य नरेंद्र देव, राम मनोहर लोहिया, नाना पाटील हे सर्व एके काळी काँग्रेसचे धुरंधर होते. महाराष्ट्रातील शरद पवार यांनी उभी हयात काँग्रेस पक्षात घालवली. आज अशी माणसे काँग्रेस पक्षात उरली नसतील तर त्यास जबाबदार कोण? प. बंगालात ममता बॅनर्जी, आसामात हेमंत बिस्व सरमा, पुद्दुचेरीत एन. रंगास्वामी हे मूळचे काँग्रेसी असलेले नेते इतरत्र जाऊन मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले, यास जबाबदार कोण? असा सवाल शिवसेनेनं केला आहे.