लखनौ : उत्तर प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रोज मोठमोठ्या घोषणा केल्या जात आहेत. आता राज्य सरकारचे कर्मचारी आणि वकिलांसाठी केवळ एक रुपयात घरे देण्याच्या योजनेवर उत्तर प्रदेश सरकार काम करत असल्याची माहिती आहे.
उत्तर प्रदेशात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी योगी सरकार एका मोठ्या योजनेवर काम करत आहे. उत्तर प्रदेश सरकार गट ‘क’ आणि गट ‘ड’च्या लाखो कर्मचाऱ्यांना आणि वकिलांना अनुदानावर घरे उपलब्ध करून देणार आहे. महत्वाचे म्हणजे या योजनेत घर खरेदी करणाऱ्यांकडून जमिनीचे नाममात्र मूल्य म्हणून केवळ एक रुपया घेण्यात येणार आहे. तसेच, खरेदी करणाऱ्यांना 10 वर्षांपर्यंत ते विकता येणार नाही, या अटीवरच सवलत दिली जाणार आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उच्चाधिकाऱ्यांच्या बैठकीत याचा मसुदा तयार करण्यात आला आहे. वरिष्ठ पातळीवर मंजुरी मिळाल्यानंतर हा प्रस्ताव मंत्रिमंडळाकडून मंजूर केला जाईल. मंत्रिमंडळाने ठराव केल्यानंतरच या योजनेचा लाभ मिळणार आहे. सध्या गट ‘क’ आणि ‘ड’ च्या कर्मचाऱ्यांना सवलतीत घरे देण्याची व्यवस्था नाही.