नाशिक : शिवसेनेकडून हेमंत गोडसे यांना नाशिकमधून उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यामुळे नाशिकचा सस्पेन्स अखेर संपला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून नाशिकच्या जागेवरुन महायुतीमध्ये घोळ सुरु होता. अखेर आज हेमंत गोडसे यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. शिवसेनेने अधिकृतपणे याची घोषणा केली आहे.
नाशिकची जागा कुणाकडे जाणार याबाबतही विविध तर्क लावले जात होते. काही दिवसांपूर्वी या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या छगन भुजबळ यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती. पण, त्यांनी आपण माघार घेत असल्याचं जाहीर केलं होतं. उमेदवारी जाहीर करण्यास वेळ होत असल्याने हा निर्णय घेतला असल्याचं ते म्हणाले होते. हेमंत गोडसे यांनी उमेदवारी मिळावी यासाठी जोर लावला होता. पण, नाशिकमधील भाजपच्या काही नेत्यांनी त्यांच्या नावाला विरोध केला होता. मात्र, स्थानिक नेत्यांचा विरोध झुगारुन गोडसे यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे भाजपचे स्थानिक नेते काय भूमिका घेतात हे पाहावं लागणार आहे.