सोलापूर :- जिल्हास्तरीय लोकशाही दिनात प्राप्त झालेल्या तक्रारी अर्जावर संबंधित विभागाच्या प्रमुखांनी किंवा सक्षम प्राधिकारी यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून उत्तर देणे अपेक्षित आहे. संबंधित तक्रारदाराला योग्य उत्तर मिळाल्यानंतर तो पुन्हा पुन्हा लोकशाही दिनात येणार नाही. तरी यापुढील काळात सर्व शासकीय यंत्रणा प्रमुखांनी स्वतः उपस्थित राहावे, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय लोकशाही दिनामध्ये प्राप्त झालेल्या तक्रारीच्या अनुषंगाने चर्चा करताना जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे, उत्पादन शुल्क अधीक्षक नितीन धार्मिक, जिल्हा प्रशासनाधिकारी नगरपालिका वीणा पवार यांच्यासह अन्य विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.
जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले की, जिल्हास्तरीय लोकशाही दिनात सर्वसामान्य नागरिकांच्या आलेल्या तक्रारींचा निपटारा होणे अत्यंत आवश्यक आहे, त्यादृष्टीने सर्व संबंधित शासकीय यंत्रणा प्रमुखांनी याची गांभीर्यपूर्वक नोंद घ्यावी. ज्या विभागाचे अधिकारी लोकशाही दिनात उपस्थित नाहीत. त्या अधिकाऱ्यांना उद्या पुन्हा बोलावून घ्यावे व संबंधित विभागाच्या तक्रारीचा त्यांच्याकडून निपटारा करून घ्यावा, असे निर्देश त्यांनी दिले.
जिल्हास्तरीय लोकशाही दिनात एकापेक्षा अधिक वेळा आलेल्या तक्रार अर्जांची विभाग निहाय पडताळणी करावी. प्रलंबित असलेले सर्व अर्ज पुढील पंधरा दिवसात निकाली निघावेत. व या पुढील काळात कोणताही तक्रार अर्ज तात्काळ निकाली निघण्यासाठी संबंधित विभागांनी योग्य नियोजन करावे. त्याप्रमाणेच पालकमंत्री कक्ष व मुख्यमंत्री कक्ष यांच्याकडे प्राप्त झालेल्या संबंधित विभागाच्या तक्रारी कक्षामार्फत तात्काळ संबंधित विभागाकडे पाठवल्या जातात, त्यावरही अत्यंत गतीने कार्यवाही करून तक्रार अर्जाचा निपटारा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिले.
लोकशाही दिन तक्रारी-
आजच्या जिल्ह्यस्तरीय लोकशाही दिनात 25 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यातील बहुतांश तक्रारी या जुन्याच होत्या. पुढील विभागाच्या तक्रारी झाल्या प्राप्त... भूमी अभिलेख, जिल्हा परिषद पाणीपुरवठा विभाग, महसूल, भविष्य निर्वाह निधी, जिल्हा उपनिबंधक, कामगार विभाग, जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभाग, महावितरण, ऑफिसर्स क्लब, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, पंढरपूर नगरपरिषद, प्रदूषण महामंडळ, भूसंपादन, पाटबंधारे विभाग, पोलीस विभाग, आरटीओ व जिल्हा जात पडताळणी समिती आदीबाबत तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यावर निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेऊन संबंधित विभागाने त्वरित कार्यवाही करावी, असे निर्देश दिले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब कांबळे यांनी माहिती अधिकार पालकमंत्री कक्ष व मुख्यमंत्री कक्ष या अनुषंगाने संबंधित विभागाचा आढावा घेऊन प्रत्येक विभागाकडे प्रलंबित असलेल्या अर्जावर त्वरित कार्यवाही करून सर्व प्रलंबित अर्ज निकाली काढून त्याची माहिती प्रशासनाला सादर करावी अशा सूचना दिल्या.