आमदार सुभाष देशमुख यांचे प्रयत्न यशस्वी जिल्हाधिकाऱ्यांसमोर प्राथमिक आराखडा सादर
दक्षिण सोलापूर तालुक्यातील हत्तरसंघ कुडल या तीर्थक्षेत्राचा विकास निरा नरसिंगपूरच्या धर्तीवर होणार आहे. याचा प्राथमिक आराखडा जिल्हाधिकाऱ्यांसमोर सादर करण्यात आला आहे. हत्तरसंग कुडलचा विकास होण्याच्या दृष्टीने आमदार सुभाष देशमुख यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता अखेर त्याला यश आले आहे.
हत्तरसंग कुडलच्या विकासासाठी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन भवन येथे बैठक घेण्यात आली. या बैठकीला आमदार सुभाष देशमुख यांच्यासह बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता माळी, जिल्हा कृषी अधिकारी बाळासाहेब शिंदे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी देवस्थानचे सदस्य आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
हत्तरसंग कुडलच्या नव्या आराखड्यामध्ये भीमा सीना संगम येथे स्कायवॉक बांधणे, टाकळी येथील मुख्य रस्त्यापासून ते कुडल संगमपर्यंत सिमेंट काँक्रीटचा रस्ता करणे, दळणवळणाच्या सोयी निर्माण करणे, तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी भक्तनिवास बांधणे, सभामंडप, व्यापारी गाळे बांधणे, नदी परिसरात बोटिंग सुरू करणे, भीमा नदीच्या बाजूस घाट बांधणे, पर्यटकांच्या मनोरंजनासाठी लेसर शो सुरु करणे, लहान मुलांसाठी चिल्ड्रन पार्क बांधणे, ज्येष्ठ नागरिकांसाठी उद्यान बांधणे, मंदिरा समोर कायमस्वरूपी हेलीपॅड तयार करणे, दुचाकी आणि चार चाकी वाहनांसाठी सुसज्ज असे वाहनतळ उभा करणे, टाकळी हायवेजवळ मोठा माहिती फलक उभारणे, टाकळी हायवेपासून ते मंदिरापर्यंत पथदिवे बसवणे यासह विविध बाबींचा समावेश होणार आहे. यावेळी आमदार सुभाष देशमुख यांनी तीर्थक्षेत्राचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी चित्रफीत काढावी, छोट्या बाबी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून घ्याव्यात या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी शैक्षणिक सहली काढाव्यात यासह विविध सूचना केल्या. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रथम घ्यावयाच्या कामाला प्राधान्य द्यावे, प्रस्तावित कामांचे वर्गीकरण करावे, अंतर्गत येणाऱ्या जमिनीचे भूसंपादन करावे, पंढरपूर तीर्थक्षेत्राच्या धरतीवर प्रचार आणि प्रसार करावा, बांधकाम विभागाने लवकरात लवकर पूर्व गणक पत्रक सादर करावे यासह विविध सूचना अधिकाऱ्यांना दिल्या.
डॉक्टर व्यंकटेश मेतन यांनी हत्तरसंग कुडलची वेबसाईट काढावी या ठिकाणी गाईडची नियुक्ती करावी, मंदिरावर एक लघुपट करावा, परिसरात पुरातत्त्व संग्रहालय बांधावे यासह विविध सूचना केल्या. बैठकीला विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
हत्तरसंग कुडलला अव्वल तीर्थक्षेत्र बनवणार: आ. देशमुख
प्रशासनाने लवकरात लवकर सर्व बाबींची पूर्तता करून त्याचा अहवाल सादर करावा. यासाठी जास्तीत जास्त निधी केंद्र आणि राज्य सरकारकडून आपण मिळवू, हत्तरसंग कुडलला राज्यातील अव्वल तीर्थक्षेत्र बनवू असे आमदार सुभाष देशमुख यांनी सांगितले.