येस न्युज मराठी नेटवर्क : अॅड गुणरत्न सदावर्ते यांना गिरगाव कोर्टाने आणखी २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. मुंबई पोलिसांची विनंती मान्य करत कोर्टाने सदावर्ते यांना १३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मुंबई पोलिसांच्या वतीने सरकारी वकील अॅड प्रदीप घरत यांनी योरदार युक्तीवाद करत तपास प्राथमिक टप्प्यात असल्याने पोलिस कोठडी आवश्यक असल्याचं सांगत सदावर्तेंच्या विरोधात पोलिसांकडे सबळ पुरावे आहेत. पोलिस कोठडीच्या दोन दिवसांत त्यांची चौकशी केली गेली आहे. पण दोन दिवसांचा कालावधी हा चौकशीसाठी पुरेसा नाहीय. ‘कुछ बातें हो चुकी है, कुछ बातें अभी है बाकी’, अशी परिस्थिती असल्याने सदावर्तेंना पोलिस कोठडी मिळावी, अशी मागणी केली होती. न्यायालयाने सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाचे युक्तीवाद ऐकल्यानंतर सदावर्तेंना आणखी २ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
शरद पवार यांच्या घरावरील हल्ल्याच्या संदर्भात मुंबई पोलिसांनी गुणरत्न सदावर्ते यांना अटक केली. दोन दिवसांच्या पोलिस कोठडीनंतर आज पुन्हा गिरगाव कोर्टात सुनावणी पार पडली. गुणरत्न सदावर्ते यांच्याविरोधात मुंबई पोलिसांकडे सबळ पुरावे आहेत. त्यामुळे त्यांची आणखी चौकशी करणं गरजेचं आहे, असा युक्तीवाद मुंबई पोलिसांच्या वतीने सरकारी वकील अॅड प्रदीप घरत यांनी केला. तर पोलिसांना सदावर्ते यांच्याविरोधात एवढी सगळी माहिती असूनही मग आंदोलनस्थळी बंदोबस्त का ठेवला नाही? असा उलटसवाल सदावर्ते यांचे वकील कुलकर्णी यांनी विचारला. तसंच आंदोलनस्थळी केवळ आंदोलन झालं. हल्ला झाला नाही. दगडफेक झाली नाही. संतप्त जमावाने अपवादाने फक्त चप्पल भिरकावल्या, अशी सारवासारव सदावर्ते यांचे वकील कुलकर्णी यांनी केली. अखेर दोन्ही बाजूंचे युक्तीवाद ऐकल्यानंतर गिरगाव न्यायालयाने सदावर्ते यांच्या पोलिस कोठडीत २ दिवसांची वाढ केली आहे.