सोलापूर :- नियोजन भवन परिसरात जिल्हा सांख्यिकी कार्यालयाची नूतन इमारत सुमारे एक कोटी निधी खर्च करून बांधण्यात आलेली आहे. या इमारतीचे लोकार्पण उच्च व तंत्र शिक्षण मंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते नामफलक अनावरण व फीत कापून करण्यात आले. यावेळी इमारतीची पाहणी करून सांख्यिकी विभागाने उत्कृष्ट अशा या नवीन इमारतीमध्ये अधिक गतिमान पद्धतीने कामकाज करावे, असे त्यांनी सुचित केले.
यावेळी खासदार जयसिद्धेश्वर शिवाचार्य महास्वामी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, अप्पर जिल्हाधिकारी मोनिका ठाकूर सिंग, उपजिल्हाधिकारी महसूल अमृत नाटेकर, सांख्यिकी उपसंचालक दिनकर बंडगर, श्री. माळी जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संजय माळी, कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे, सहाय्यक नियोजन अधिकारी पुंडलिक गोडसे यांच्यासह सांख्यिकी व नियोजन विभागाचे अन्य अधिकारी उपस्थित होते.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने नियोजन भवन परिसरात जिल्हा सांख्यिकी कार्यालय व जिल्हा नियोजन समितीच्या अभिलेख कक्षासाठी सुमारे एक कोटी निधी खर्च करून 414 चौरस मीटर अशी दुमजली इमारत बांधण्यात आलेली आहे. या इमारतीमध्ये अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना स्वतंत्र केबिन देण्यात आलेल्या आहेत. तसेच बाह्य व अंतर्गत पाणीपुरवठा, जल निसारण, विद्युतीकरण, फर्निचर व अकस्मिक खर्च इत्यादी बाबींचा समावेश करण्यात आल्याची माहिती कार्यकारी अभियंता दत्तात्रय गावडे यांनी दिली.