सोलापूर : शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी, पालकांसाठी नेहमीच स्पर्धा घेण्यात येतात. परंतु पी.आर.बी. हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये चक्क विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांसाठी अनोख्या स्पर्धा घेण्यात आल्या.
पी.आर.बी. हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये ग्रँड पेरेंट्स डे उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्त शाळेत आजी आजोबांसाठी खास कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून कवी माधव पवार व त्यांच्या सुविद्य पत्नी चारुदेवी पवार उपस्थित होत्या. तर लिटिल स्टार नर्सरीचे संस्थापक इकबाल चौगुले, इंद्रायणी व्यास यांची प्रमुख उपस्थिती होती.
कार्यक्रमासाठी शाळेत येणाऱ्या आजी-आजोबांना गुलाबपुष्प, चॉकलेट देऊन स्वागत करण्यात आले. याप्रसंगी आजी-आजोबांकरिता रांगोळी स्पर्धा, कुकिंग विदाऊट गॅस, रॅम्प वॉक, गायन, वन मिनिट शो यासारखे विविध कार्यक्रम घेण्यात आले.
यावेळी संस्थेचे सल्लागार बी. के. नाईक, अध्यक्षा लतादेवी नाईक, संस्थेच्या सचिवा शालिनी नाईक, मुख्याध्यापिका सुप्रिया कुलकर्णी, उपमुख्याध्यापिका सविता जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. सुरेखा भोरे व आरती सलवदे यांनी सूत्रसंचालन केले. विद्यार्थ्यांच्या आजी-आजोबांसाठी घेण्यात आलेल्या या कार्यक्रमांमध्ये आजी – आजोबांनी मोठ्या प्रमाणावर सहभाग नोंदवला.