पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची 14 मार्चला होणारी पूर्व परीक्षा पुढे ढकलल्यामुळे पुण्यात विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. पुण्याच्या नवी पेठ परिसरात या विद्यार्थ्यांनी रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरु केले आहे. मात्र, या आंदोलनातील एक चेहरा सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर या आंदोलनाचे नेतृत्त्व करत आहेत. त्यांचा या आंदोलनातील सहभाग अनेकांसाठी आश्चर्याचा धक्का ठरला. गोपीचंद पडळकर MPSC विद्यार्थ्यांच्या आंदोलनात काय करत आहेत, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.
गोपीचंद पडळकर यांच्यामुळे आंदोलन विद्यार्थ्यांनाही चांगलेच स्फुरण चढले आहे. गोपीचंद पडळकर रस्त्यावर आडवे पडून सरकारविरोधात घोषणबाजी करत आहेत. जोपर्यंत सरकार परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय रद्द करत नाही तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही, असा निर्धार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केला.