मार्डी दि.५.देशात महिला व मुली यांच्यावर विघ्नसंतोषी लोकांकडून दिवसेंदिवस अमानुष अत्याचाराच्या घटना घडतंच चालल्या आहेत,त्या रोखण्याकरीता मुलींनी स्वसंरक्षणासाठी कराटे सारख्या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा असे प्रतिपादन सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक नामदेव गवळी गुरुजी यांनी केले.
ते वीरशैव कक्कय्या समाज प्रबोधन मंच मार्डी च्या वतीने,देशाचे माजी गृहमंत्री तथा राष्ट्रीय कॉंग्रेस (आय) पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त,यमाई देवी प्राथमिक शाळेत खाऊ वाटप व मुलींना एक महिना मोफत कराटे प्रशिक्षणाच्या कार्यक्रमात बोलत होते.
याप्रसंगी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते संजय क्षिरसागर,वीरशैव कक्कय्या समाज प्रबोधन मंचचे अध्यक्ष तथा उत्तर सोलापूर तालुका काँग्रेसचे तालुका सरचिटणीस संजय खरटमल,पृथ्वीराज माने युवा मंचचे तालुका चिटणीस भगवान कदम,सेवालाल नगरचे- माजी सरपंच संजय वडजे,तालुका काँग्रेसचे चिटणीस सतीश पाटील,पैगंबर तांबोळी,अमर नारायणकर व शाळेतील शिक्षकवृंद उपस्थित होते.कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थ्यांच्या सुमधुर गीताने झाली.यावेळी प्रमुख पाहुणे मंडळी यांचा यथोचित सत्कार शाळेच्या वतीने संचालक व मुख्याध्यापिका यांनी केला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामदेव गवळी होते.
सर्व विद्यार्थी व विद्यार्थिनींनी ज्ञानाबरोबर स्वसंरक्षणासाठी कराटे,लाठीकाठी,दांडपट्टा व शारीरिक व्यायामाचे प्रशिक्षण घेवून आगामी काळात माता भगिनी यांचे रक्षण करण्यासाठी सज्ज व्हावे असे आवाहन नामदेव गवळी गुरुजी यांनी याप्रसंगी केले.
मी मागील पंचवीस वर्षांपासून राजकीय जीवनात काम करीत असताना,सत्तेचा सदुपयोग केवळ ठेकेदारी किंवा स्व:हितासाठी न करता समाजातील उपेक्षित व वंचित घटकांच्या जीवनात आनंद फुलविण्याकरितांच कुठल्याही लालसेची अपेक्षा न बाळगता आजपावेतो काम करीत आलो असल्याचे मत संजय क्षिरसागर यांनी याप्रसंगी बोलताना व्यक्त केले.त्यांनी या आश्रम शाळेतील शैक्षणिक कामाचे कौतुक करुन समाधान व्यक्त केले.
याप्रसंगी शाळेत एक महिना मोफत कराटे प्रशिक्षण विद्यार्थी व विद्यार्थीनींना देण्यासाठी मी युनिव्हर्सल कराटे प्रशिक्षण संस्थेमार्फत वीरशैव कक्कय्या समाज प्रबोधन मंचच्या विनंतीला मान देवून आली असल्याचे प्रशिक्षिका अपूर्वा देवानंद कोळेकर यांनी सांगून कराटे च्या संदर्भात आपल्या स्वसंरक्षणासाठी बचाव कसा करावा याबाबत विवेचन करीत विविध प्रात्यक्षिके दाखविली.
यावेळी उपस्थित मान्यवर तसेच विद्यार्थी विद्यार्थिनींनी,ती रणरागिणी कराटे प्रशिक्षीका अपूर्वा देवानंद कोळेकर,हिने सादर केलेल्या धाडसी प्रात्यक्षिकांचे टाळ्यांच्या गजरात कौतुक करुन पाहुण्यांच्या हस्ते तीला पुष्पगुच्छ देवून गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय खरटमल यांनी केले तर उपस्थितांचे आभार करे गुरुजी यांनी मानले व सुत्रसंचलन करे गुरुजी यांनी केले.